राजकारणात येणार का? राहुल द्रविडनं दिलं उत्तर

राजकारणामध्ये येणार का? असा प्रश्न भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडला विचारण्यात आला.

Updated: Sep 22, 2018, 04:55 PM IST
राजकारणात येणार का? राहुल द्रविडनं दिलं उत्तर

मुंबई : राजकारणामध्ये येणार का? असा प्रश्न भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडला विचारण्यात आला. तेव्हा मला राजकारणात स्वारस्य नाही. २०१९ साली निवडणुकीत मैदानात उतरण्याचा कोणताही इरादा नसल्याचं राहुलनं सांगितलं. कोणत्या राजकीय पक्षानं तुझ्याशी संपर्क साधला आहे का? असा सवाल विचारला असता राहुल द्रविडनं हसला, आणि कोणीही मला संपर्क केला नाही आणि राजकारणाची मला आवड नाही, असं मत राहुलनं व्यक्त केलं. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी अनेकवेळा चर्चा होऊनही स्वत:ला राजकारणापासून लांब ठेवलं. गांगुली मात्र क्रिकेट प्रशासनामध्ये आला. सध्या तो बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे.

शास्त्रींच्या वक्तव्यावर द्रविड म्हणतो...

इंग्लंड दौऱ्यावेळी सध्याची भारतीय टीम ही मागच्या १५-२० वर्षांमधली प्रवास करणारी सर्वोत्तम टीम आहे, असं वक्तव्य भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी केलं होतं. त्यावरही राहुलनं प्रतिक्रिया दिली आहे. कोण सर्वश्रेष्ठ आहे आणि कोण नाही हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. तर टीम काय शिकली आणि आता शिकून पुढे कसं जायचं? पुढच्या दौऱ्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे? हे महत्त्वाचं आहे, असं द्रविड म्हणाला.

शास्त्रीच्या वक्तव्याला मसाला लावून पेश करण्यात आलं. शास्त्री काय विचार करतो यावर टिप्पणी करण्याची मला अजिबात इच्छा नाही, अशी प्रतिक्रिया द्रविडनं दिली. 

द्रविडच्या नेतृत्वात भारताचा विजय

या इंग्लंड दौऱ्यात ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा ४-१नं पराभव झाला होता. तर मागच्यावेळी धोनीच्या नेतृत्वातही भारतावर पराभवाची नामुष्की ओढावली होती. २००७ साली द्रविडच्या नेतृत्वात भारतानं इंग्लंडमध्ये शेवटची टेस्ट सीरिज जिंकली होती. २००७ साली भारतानं इंग्लंडला १-०नं हरवलं होतं.