close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

टीम इंडियाचा पुन्हा प्रशिक्षक झाल्यानंतर रवी शास्त्री म्हणतात...

रवी शास्त्री यांची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा निवड झाली आहे. 

Updated: Aug 18, 2019, 09:13 PM IST
टीम इंडियाचा पुन्हा प्रशिक्षक झाल्यानंतर रवी शास्त्री म्हणतात...

मुंबई : रवी शास्त्री यांची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा निवड झाली आहे. २०२० सालच्या शेवटी होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपपर्यंत शास्त्री टीम इंडियाचे प्रशिक्षक राहतील. पुन्हा एकदा टीम इंडियाचा प्रशिक्षक झाल्यानंतर रवी शास्त्रींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

प्रशिक्षकपदी अजून दोन वर्ष काम करता येणार असल्यानं आपण आनंदी असल्याचं रवी शास्त्री यांनी म्हटलंय. भारतीय संघातील खेळाडू तरुण आहेत. प्रदीर्घ काळ लक्षात घेतल्यास भारताची बेंच स्ट्रेन्थही चांगली आहे. दरम्यान विश्वचषकातील उपांत्य फेरीतील पराभव हा निराश करणारा होता असंही रवी शास्त्री म्हणाले.

कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगस्वामी यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने पुन्हा एकदा रवी शास्त्रींचीच निवड करावी, असा सल्ला बीसीसीआयला दिला, यानंतर रवी शास्त्रींचा प्रशिक्षक होण्याचा मार्ग मोकळा झाला. क्रिकेट सल्लागार समितीने रवी शास्त्री यांच्या नावाला पहिली पसंती दिली. तर माईक हेसन दुसऱ्या आणि टॉम मूडी यांना तिसरी पसंती देण्यात आली होती.

रवी शास्त्री, माईक हेसन, टॉम मूडी, फिल सिमन्स, लालचंद राजपूत आणि रॉबिन सिंग हे ६ जण टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्याच्या स्पर्धेत होते. वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याआधी कर्णधार विराट कोहलीनेही शास्त्रींच्याच नावाला पसंती दिली होती. रवी शास्त्री पुन्हा प्रशिक्षक झाले, तर आपल्याला आनंद होईल, असं कोहली म्हणाला होता.

तत्कालिन प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यासोबत विराट कोहलीचे वाद झाल्यानंतर रवी शास्त्री जुलै २०१७ साली प्रशिक्षक बनले होते. त्यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने २१ टेस्ट सामने खेळले ज्यामध्ये १३ सामने भारताने जिंकले. ३६ पैकी २५ टी-२० आणि ६० पैकी ४३ वनडे सामने भारताने जिंकले आहेत. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भारताने एकूण ८१ सामने जिंकले.