कोलंबो : टीम इंडियाचा कोच रवी शास्त्रीनं टीम इंडियाच्या माजी दिग्गज क्रिकेटपटूंवर निशाणा साधला आहे. विराट कोहलीच्या या टीमची कामगिरी आधीच्या दिग्गजांची नावं असलेल्या टीमपेक्षा चांगली आहे, असं शास्त्री म्हणाला आहे. टीम इंडिया आता अनुभवी झाल्याचंही रवी शास्त्री म्हणाला आहे.
२०१५ सालच्या श्रीलंका दौऱ्यामध्ये कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाचा विजय झाला होता. २२ वर्षानंतर टीम इंडियानं श्रीलंकेमध्ये टेस्ट सीरिज जिंकली होती. याचा दाखला रवी शास्त्रीनं दिला आहे. टीम इंडियामध्ये असेही खेळाडू होते जे २० वर्ष देशासाठी खेळले पण त्यांना श्रीलंकेमध्ये जिंकता आलं नाही पण कोहलीच्या टीमनं हे केल्याचं शास्त्री म्हणाला.
रवी शास्त्रीच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण व्हायची शक्यता आहे. याआधी राहुल द्रविडच्या नेतृत्वात भारतानं २००७मध्ये इंग्लंडला त्यांच्याच मैदानात १-०नं हरवलं होतं. गांगुलीच्या नेतृत्वात भारतानं ऑस्ट्रेलियातली सीरिज १-१ नं ड्रॉ केली होती. तसंच २००२मध्ये इंग्लंडमधली सीरिजही ड्रॉ झाली होती.
महेंद्रसिंग धोनी कर्णधार असताना २००९ साली टीम इंडियानं न्यूझीलंडमधली सीरिज १-०नं जिंकली होती. धोनीच्याच नेतृत्वात टीम इंडियानं २०११मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळलेली सीरिज १-१नं ड्रॉ केली होती.