Ricky Ponting : जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये रिकी पॉन्टिंगचं (Ricky Ponting) नाव घेतलं जातं. नुकंतच त्याच्याबद्दल एक वाईट बातमी समोर आली होती. ऑस्ट्रेलिया विरूद्ध वेस्टइंडिज (AUS vs WI) यांच्यामध्ये होणाऱ्या पहिल्या टेस्ट (First Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अचानक तब्येत बिघडली. ज्यामुळे रिकीला रूग्णालयात (Admitted in hospital) देखील दाखल करावं लागलं होतं. काल त्याच्या छातीत दुखत असून त्याला चक्करही येत होती. मात्र सुदैवाची गोष्ट म्हणजे त्याला आता रूग्णालयातून घरी पाठवण्यात आलं आहे. यानंतर तो चौथ्या दिवशी कमेंट्री बॉक्समध्ये (Comentry Box) पुन्हा परतलाय.
दरम्यान कालच्या दिवसात नेमकं का घडलं हे 47 वर्षीय रिकी पॉन्टिंगने स्वतः सांगितलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, थोडा वेळ मी रूग्णालयात होतो, मला त्यांनी आराम करायला सांगितला. महान स्पिनर शेन वॉर्न आणि रोडनी मार्श यांचं हृदयविकाराच्या झटका आल्याने निधन झाल्यानंतर माझ्या छातीत दुखणं मी गंभीरतेने घेतलं.
ऑस्ट्रेलिया विरूद्ध वेस्ट इंडिज सामन्याच्या चौथ्या दिवशी चॅनल सेव्हनशी बोलताना पॉन्टिंग म्हणाला, मी काल खूप लोकांना घाबरवलं. मुळात काल मी स्वतः खूप घाबरलो होतो. मी कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलो होतो, तेव्हा माझ्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. मी वेदना दूर व्हाव्यात म्हणून प्रयत्न केला, पण तसं होऊ शकलं नाही.
गेल्या 12 ते 18 महिन्यांमध्ये माझ्या काही साथीदारांसोबत ज्या घटना घडल्या, त्यामुळे कालचा दिवस माझ्यासाठी मोठी शिकवण होता. पॉन्टिंगचे साथीदार जस्टिन लंगरने पॉन्टिंगला जिने उतरण्यासाठी मदत केली. यानंतर रिकीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रिकी पॉन्टिंगची गणना होते. पॉन्टिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दोन वेळा वर्ल्ड कपचं (ODI World Cup) जेतेपद पटकावलं आहे. रिकी पॉन्टिंग कर्णधार असताना ऑस्ट्रेलियाने 2003 आणि 2007 मध्ये वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं.
रिकी पॉन्टिंगने नोव्हेंबर 2012 मध्ये आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली. पॉन्टिंग आपल्या देशासाठी 168 कसोटी, 375 एकदिवसीय आणि 17 टी20 सामने खेळला आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दित त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 13,378 तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 13,704 धावा केल्या आहेत. टी20 क्रिकेटमध्येही त्याच्या खात्यात 401 धावा जमा आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत पॉन्टिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे, पॉन्टिंगने 71 शतकं केली आहेत. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीच्या नावावरही 71 शतकं जमा आहेत. सर्वाधिक शतकांच्या यादीत 100 शतकांसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे.