'हवेत शॉट खेळण्यात काहीच गैर नाही, पण...' रोहितचा युवा खेळाडूंना सल्ला

रोहित शर्माचा भारतीय खेळाडूंना सल्ला

Updated: Dec 27, 2019, 09:27 PM IST
'हवेत शॉट खेळण्यात काहीच गैर नाही, पण...' रोहितचा युवा खेळाडूंना सल्ला title=

मुंबई : अंडर-१९ वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेला जाणाऱ्या भारतीय टीमला रोहित शर्माने मोलाचा सल्ला दिला आहे. हवेत शॉट खेळण्यात काहीच गैर नाही, पण खेळाची समज असणं महत्त्वाचं आहे, असं रोहित शर्मा म्हणाला. आम्ही लहान असताना हवेत शॉट खेळले तर आमचे प्रशिक्षक आम्हाला नेटबाहेर हाकलायचे, जे योग्य नव्हतं. जर तुम्हाला निकाल हवे असतील तर असे शॉट खेळण्यात काहीही गैर नाही, असं रोहित शर्मा म्हणाला आहे.

भारताची अंडर-१९ टीम मजबूत आहे. मागच्यावेळी आपण वर्ल्ड कप जिंकला होता. यावेळी टीम जिंकेल का नाही, हे मी सांगू शकत नाही, पण खेळाडू नक्कीच चांगली कामगिरी करतील, असा विश्वास रोहितने वर्तवला. खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ही मोठी स्पर्धा आहे, त्यामुळे सगळेच चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील.

१३व्या अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये १६ टीम सहभागी झाल्या आहेत. या टीमना ४ ग्रुपमध्ये टाकण्यात आलं आहे. प्रियम गर्ग भारताचं नेतृत्व करणार आहे. १७ जानेवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ग्रुप-एमध्ये भारतासोबत जपान, न्यूझीलंड आणि श्रीलंकेची टीम आहे. प्रत्येक ग्रुपमधल्या टॉप-२ टीम सुपर लीग स्टेजमध्ये प्रवेश करतील.

भारताने मागच्यावेळी पृथ्वी शॉच्या नेतृत्वात अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला होता. भारतानं आतापर्यंत ४ वेळा अंडर-१९ वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. एवढे वेळा अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकणारी भारतीय टीम ही एकमेव आहे. भारताला आपली पहिली मॅच १९ जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध खेळायची आहे. यानंतर २१ आणि २४ जानेवारीला भारत जपान आणि न्यूझीलंडविरुद्ध खेळेल.