'मस्त डब्बा घातला'; मुंबईच्या पराभवावर कांबळीची टीका

रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईला रेल्वेच्या टीमकडून पराभवाचा धक्का बसला आहे. 

Updated: Dec 27, 2019, 07:55 PM IST
'मस्त डब्बा घातला'; मुंबईच्या पराभवावर कांबळीची टीका title=

मुंबई : रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईला रेल्वेच्या टीमकडून पराभवाचा धक्का बसला आहे. मुंबईच्या या कामगिरीवर माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने टीका केली आहे. 'मुंबईच्या टीमने मस्त डब्बा घातला. खूप खराब कामगिरी. आंतरराष्ट्रीय सामना ५ दिवसांनी असताना श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे मुंबईच्या टीममध्ये का नाहीत? मुंबईची सर्वोत्तम टीम मैदानात उतरायला पाहिजे,' असं ट्विट विनोद कांबळीने केलं आहे.

रेल्वेचा कर्णधार कर्ण शर्माने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर खराब बॅटिंगमुळे मुंबईची टीम फक्त ११४ रनवर ऑल आऊट झाली. कर्णधार सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ३९ रन आणि जय बिस्टाने २१ रन केले. रेल्वेच्या टी प्रदीपने सर्वाधिक ६ विकेट आणि अमित मिश्राने ३ विकेट घेतल्या.

मुंबईची टीम ऑल आऊट झाल्यानंतर रेल्वेने कर्णधार कर्ण शर्माच्या नाबाद ११२ रन आणि अरिंदम घोषच्या ७२ रनमुळे २६६ रन केले. यामुळे रेल्वेला पहिल्या इनिंगमध्ये १५२ रनची आघाडी मिळाली. मुंबईच्या तुषार देशपांडेने रेल्वेच्या ४ विकेट घेतल्या.

मुंबईने दुसऱ्या इनिंगमध्ये सूर्यकुमार यादवच्या ६५ रन आणि आकाश पारकरच्या नाबाद ३५ रनच्या जोरावर १९८ रन केले. रेल्वेच्या हिमांशू सांगवानने ५ विकेट घेतल्या. रेल्वेला या मॅचमध्ये विजयासाठी फक्त ४७ रनचं आव्हान मिळालं. हे आव्हान त्यांनी एकही विकेट न गमावता पार केलं.

बडोद्याविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये मुंबईचा ३०९ रननी विजय झाला होता. आता मुंबईची पुढची मॅच कर्नाटकविरुद्ध ३ जानेवारीपासून सुरु होणार आहे. बीकेसी मैदानामध्ये हा सामना रंगणार आहे.