मुंबई : यो-यो टेस्टमध्ये रोहित शर्मा पास झाला आहे. यामुळे भारतीय वनडे टीममध्ये सहभागी होण्याचा रोहितचा मार्ग मोकळा झाला आहे. इंग्लंड दौऱ्यातल्या वनडे टीममध्ये स्वत:ची जागा पक्की करण्यासाठी खेळाडूंना १५ जूनला यो-यो टेस्ट देणं बंधनकारक होतं. या टेस्टसाठी रोहित शर्मा न आल्यामुळे त्याच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मागच्या आठवड्यात झालेल्या यो-यो टेस्टमध्ये अंबती रायडू सोडून सगळे खेळाडू पास झाले होते. यामध्ये विराट आणि धोनीचाही समावेश होता. रोहित शर्मा वैयक्तिक कारण देऊन यो-यो टेस्टसाठी आला नाही. बीसीसीआयनंही त्याला परवानगी दिली.
१५ जूनला यो-यो टेस्ट न दिल्यामुळे रोहित शर्मानं २० तारखेला यो-यो टेस्ट दिली. ही टेस्ट आपण पास केली असल्याची माहिती रोहितनं सोशल मीडियावर दिली. याचवेळी फिटनेसवर टीका करणाऱ्यांवरही रोहितनं निशाणा साधला.
मी माझा वेळ कुठे घालवतो यामध्ये दखल द्यायची कोणालाही गरज नाही. जोपर्यंत मी नियमांचं पालन करतोय तोपर्यंत मला माझ्या पद्धतीनं वेळ घालवण्याचा अधिकार आहे. महत्त्वाच्या बातम्यांवर चर्चा करा. यो-यो टेस्टमध्ये पास होण्यासाठी मला फक्त एकच संधी देण्यात आल्याचं मला काही चॅनला सांगायचंय, असं ट्विट रोहितनं केलं.
Dear... it’s no ones business how & where I spend my time.I’m entitled to have time off as long as I follow protocol.Let’s debate some real news shall we & to a few channels,I had just 1 chance to clear my yo-yo that was today.Verification before reporting is always a good idea
— Rohit Sharma (@ImRo45) June 20, 2018
रोहित शर्मा यो-यो टेस्टमध्ये अयशस्वी ठरला असता तर त्याच्याऐवजी भारताच्या टेस्ट टीमचा कर्णधार अजिंक्य रहाणेला संधी देण्यात येणार होती. भारताच्या टेस्ट टीममध्ये असलेला मोहम्मद शमी, वनडे टीममध्ये निवड झालेला अंबाती रायडू आणि भारतीय ए टीममध्ये निवड झालेला संजू सॅमसन यो-यो टेस्टमध्ये अयशस्वी झाले होते. त्यामुळे या तिघांनाही टीममध्ये समाविष्ट करण्यात आलं नव्हतं. भारताच्या ब्रिटन दौऱ्याची सुरुवात २७ जूनपासून होणार आहे. आयर्लंडविरुद्ध भारताच्या २ टी-20 मॅच आहेत. यानंतर भारत इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. २३ जूनला दिल्लीवरून भारतीय टीम रवाना होणार आहे.