सचिनच्या वाढदिवसाला अभिषेकने बनवलं कोरोनाला टोलावणारं 'मोझॅक आर्ट'

गेल्या २० वर्षांपासून करतोय सचिनचं कलेक्शन 

Updated: Apr 24, 2020, 09:23 AM IST
सचिनच्या वाढदिवसाला अभिषेकने बनवलं कोरोनाला टोलावणारं 'मोझॅक आर्ट' title=

प्रविण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपट्टू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ४७ व्या वर्षात पदार्पण करतोय. त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याचा चाहतावर्ग आजही कमी झालेला नाही. ज्या ज्या कार्यक्रमांना सचिन जातो तिथे सर्व चाहता वर्ग पोहोचलेला असतो. सचिन मैदानात नसला तरी प्रेक्षकांमध्ये सचिनचे चाहते पाहायला मिळतात. कोणी त्याच्या नावाचा टॅटू काढतो, कोणी सायकलने प्रवास करतो..कोणी चेहरा रंगवतो..असे बरेच चाहते सचिनप्रेमापोटी काही ना काही करत असतात. मुंबईतला सचिनप्रेमी अभिषेक साटम देखील दरवर्षी काही ना काही कलाकृती करुन सचिनचा वाढदिवस साजरा करत असतो.

गेली २० वर्षांपासून सचिनबद्दलची ८० पुस्तक, २५० मॅग्झिन, २० वर्षांतील वर्तमानपत्र तसेच वेगवेगळ्या वस्तूंचे कलेक्शन अभिषेकच्या घरी आहे. वयाच्या १० व्या वर्षांपासून तो हे कलेक्शन करतोय.

यंदा २०२० साली म्हणजेच ४७ व्या वाढदिवसाला अभिषेक अर्ध्या इंचाचे ९ हजार ६३६ चौकोनाचा वापर करुन सचिनच्या पूल शॉटचं मोझॅक आर्ट बनवलं आहे. यामध्ये बॉलच्या जागी कोरोना दाखवण्यात आलंय. सचिनच जसं क्रिकेटच्या मैदानात बॉलर्सची धुलाई करतो तशी आपल्याला कोरोनाशी लढाई करायची आहे असा संदेश यातून देण्यात आलाय. फाईट अगेंस्ट कोरोना असे या संपूर्ण थीमचे नाव असून ५.६ बाय ३ फूटाचं हे पोट्रेट आहे. हे पोट्रेट पूर्ण होण्यासाठी अभिषेकला तब्बल १५ तास लागले.

२०१७ साली ४४ व्या वाढदिवसानिमित्त ४४ बाय २४ फुटाची रांगोळी अभिषेकने केली होती. २०१८ ला ५० बाय ३० फुटाचं पतंगाचे कागद वापरुन सचिनचं पोट्रेट बनवलं. गेल्यावर्षी २०१९ ला ४६ बाय २४ फुटांचं टेलरिंग मटेरियल वापरुन सचिनचं पोट्रेट बनवलं. या तिन्ही कलाकृतींची इंडीया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. २०१७ आणि २०१८ चे दोन्ही रेकॉर्ड हे त्या त्या वर्षाच्या टॉप १०० रेकॉर्डमध्ये नोंद झाले.

२०२३ ला सचिनचा ५० वाढदिवस आहे. गेली २० वर्ष कलेक्शन अभिषेककडे आहे. जगातील सर्वात मोठं प्रदर्शन भरवावं अशी अभिषेकची इच्छा आहे. त्या प्रदर्शनाचे उद्घाटनं सचिनच्याहस्ते व्हाव अशी इच्छा देखील त्याने झी २४ तासकडे व्यक्त केली.