सचिन-विनोदची जोडी पुन्हा मैदानात!

मुंबईकरांच्या गळ्यातला ताईत असलेली सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या दोन अफलातून फलंदाजांची जोडी पुन्हा एकदा मैदानात अवतरली.

Updated: May 9, 2019, 08:02 PM IST
सचिन-विनोदची जोडी पुन्हा मैदानात! title=

नवी मुंबई : मुंबईकरांच्या गळ्यातला ताईत असलेली सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या दोन अफलातून फलंदाजांची जोडी पुन्हा एकदा मैदानात अवतरली. मिडल सेक्स ग्लोबल अकादमीचा कॅम्प नवी मुंबईत डी. वाय. पाटील मैदानात सुरू आहे. सचिन या क्रिकेट अकॅ़डमीचा मेंटर आहे. तिथे हे दोघे दिग्गज एकत्र आले.

सचिन आणि विनोद ही मुंबईच्या शालेय क्रिकेट स्पर्धांपासून ते अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेली विक्रमवीर जोडी... या दोघांनीही आचरेकर सरांकडे क्रिकेटचे धडे गिरवले होते. १९८८ साली हॅरीस शिल्डमध्ये या दोघांनी सेंट झेवियर्स शाळेविरूद्ध उपांत्य सामन्यात खेळताना तब्बल ६६४ धावांची विक्रमी खेळी केली होती. त्यानंतर या दोघांनी मुंबईसाठी एकत्र खेळताना अनेक मैदानं गाजवली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना ही जोडी प्रचंड गाजली होती.

दोघांचा एकमेकांशी असलेला ताळमेळ हे या जोडीचं वैशिष्ट्य मानलं जातं. डावी उजवी जोडी असल्याने गोलंदाजांना संभ्रमात पाडणारी आणि स्वतःच्या भात्यात असलेले उत्तमोत्तम शॉट्स यामुळे गोलंदाजांना सीमारेशा दाखवणारी ही जोडी होती. या दोघांच्या फलंदाजीवर मुंबईकरच काय पण देशातले क्रिकेट रसिक एकेकाळी भाळले होते. आता पुन्हा एकदा अनेक वर्षांनी हे दोन दिग्गज एकत्र मैदानात उतरले. आणि पुन्हा एकदा डोळ्यांचं पारणं फेडणारी फलंदाजी दोघांनी केली.