मुंबई: कुस्तीपटू हत्याकांड प्रकरणात आता ऑलम्पिक मेडल विजेता सुशील कुमारच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुशील कुमारची माहिती देणाऱ्याला दिल्ली पोलिसांनी मोठं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. सुशील कुमारसंदर्भात महत्त्वाचा पुरावा आणि माहिती देणाऱ्या व्यक्तीला दिल्ली पोलीस खास मोठं बक्षीस देणार आहेत.
माजी ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीपटू चॅम्पियन सागर राणा हत्या प्रकरणात आता सुशील कुमार पुरता अडचणीत सापडला आहे. सागर राणाच्या हत्येनंतर सुशील कुमार फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
हरियाणाचा सागर राणा आणि सुशील कुमार या दोन गटांमध्ये दिल्लीतील छात्रसाल स्टेडियमवर वादावादी झाली. त्या वादाचं रुपांतर पुढे हाणामारीत झालं. सुशील कुमार आणि गटानं केलेल्या मारहाणीत कुस्तीपटू सागरचा मृत्यू झाला.
या हत्याकांडनंतर सुशील कुमार फरार आहे. पोलिसांनी त्याच्या घरावर देखील छापेमारी केली. काही जणांना ताब्यात देखील घेतलं मात्र अद्याप सुशील कुमारचा शोध सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटूचा पीए अजयची माहिती देणाऱ्यावर 50 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. सुशीलला शोधण्यासाठी पोलिसांनी झज्जर, गुरुग्राम, पानीपत पालथं घातलं आहे. सुशीलवर हत्या आणि अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.