नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये 21व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये आज भारतासाठी सुवर्ण दिवस ठरला. भारताने आज 4 गोल्ड मेडल जिंकले. सोबतच एक गोल्ड मेडलही पक्क झालं आहे. महिला सिंगल्समध्ये भारताची पी.व्ही सिंधुने कनाडाच्या मिशेल लीला 21-8, 21-8 ने पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली. भारताच्या सायना नेहवालने आधीच फायनलमध्ये धडक मारली आहे.
दोन्ही ही भारतीय खेळाडू आहेत. त्यामुळे कोणीही जिंकलं तरी गोल्ड मेडल भारतालाच मिळणार आहे. पुरुष सिंगल्सच्या सेमीफायनलमध्ये भारताचा एच.एस प्रणॉय मलेशियाच्या ली चोंग वी कडून पराभूत झाला. ली चोंग वी हा फायनलमध्ये भारताच्या किदांबी श्रीकांतसमोर खेळणार आहे.
आज दिवसाची सुरुवात भारतासाठी चांगली झाली. भारताची स्टार बॉक्सर एम मैरीकॉमने भारताला बॉक्सिगमध्ये गोल्ड मेडल मिळवून दिलं. मैरीकॉमने 45-48 किलोग्रॅम वजनी गटात नॉदर्न आयरलँडच्या क्रिस्टिना ओहाराला पराभूत करत गोल्ड मेडल जिंकलं. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 21 गोल्ड मेडल, 13 सिल्वर मेडल आणि 14 कांस्य पदक जिंकले आहेत. सर्वाधिक मेडलच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे.