Sania Mirza Retirement : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिने गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान आता महत्त्वाची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) आणि सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाची (sania mirza divorce) जोरदार चर्चा होती. यानंतर आता सानिया मिर्झाने (Sania Mirza) वेगळीच घोषणा केली. सानिया मिर्झाने टेनिमधून निवृत्ती घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सानिया मिर्झाने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये ती शेवटची खेळताना दिसणार आहे.
गेल्या 20 वर्षांपासून अनेकांसाठी आदर्श असलेली सानिया मिर्झाने आपली व्यावसायिक कारकीर्द संपवण्याची घोषणा केली आहे. 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या WTA 1000 स्पर्धेतील दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये सानिया आपला शेवटचा सामना खेळणार आहे. सानियाची कारकीर्द चांगली होती. पण सहा महिन्यांपूर्वी झालेल्या दुखापतीमुळे ती कोर्टाबाहेर होती आणि आता तिने कारकीर्द पुढे न नेण्याचा विचार करत निवृत्तीची घोषणा केली आहे. सानिया मिर्झाने 2003 मध्ये प्रो-टेनिस खेळण्यास सुरुवात केली होती.
सानिया मिर्झाची यशस्वी कारकिर्द
सानिया मिर्झाने तिच्या कारकिर्दीत दुहेरीमध्ये 6 वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे. तसेच दुहेरीत प्रथम क्रमांकाचे मानांकनही मिळवण्याचा मानही सानियाकडे आहे. महिला एकेरीत तिची सर्वोत्तम रँकिंग 27 आहे. यूएस ओपनची चौथी फेरी गाठल्यानंतर 2005 मध्ये सानियाने हे मानांकन मिळवले होते. 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीत तिने पहिल्यांदा यश मिळवले.
पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मान
भारतीय टेनिसमधील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सानियाला भारत सरकारकडून 2004 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2006 मध्ये पद्मश्री पुरस्कार, 2015 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे.
2010 मध्ये शोएब मलिकसोबत लग्न
2010 मध्ये सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न केले आणि त्यांना एक मुलगा देखील आहे. या दोघांच्या लग्नाबाबत सध्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे सानिया मानसिकदृष्ट्याही अस्वस्थ असल्याचे म्हटले आहे.
निवृत्तीनंतर सानियाची योजना काय?
दरम्यान, निवृत्तीनंतर सानिया मिर्झाने तिच्या टेनिस अकादमीवर लक्ष केंद्रित करण्याची योजना आखली आहे. सानियाने त्याने हैदराबादमध्ये टेनिस अकादमीही सुरू केली आहे.