नवी दिल्ली : भारताची महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आपले वैयक्तिक आयुष्य आणि नातेसंबंध याबद्दल खूप पजेसिव्ह असल्याचे, तिने सांगितले. अभिनेत्री नेहा धूपिया हिच्या 'नो फिल्टर नेहा' या चॅट शो मध्ये तिने हा खुलासा केला.
या शो मध्ये नेहाने तिला विचारले की तू स्वतःला कोणती लव्ह टीप देशील ? त्यावर सानिया म्हणाली, "मला थोडे कमी पजेसिव्ह होण्याची गरज आहे. मी नात्यांबद्दल असुरक्षित नाही तर पजेसिव्ह आहे. आपल्या नात्यात काही समस्या असतील तर त्याबद्दल बसून चर्चा करायला हवी आणि ती देखील योग्य पद्धतीने."
या विल्स गप्पांच्या ओघात तिने हैद्राबाद पॅलेस मधील किस्सा देखील सांगितला.
सानिया म्हणाली, "मी टेनिस क्षेत्रात अव्वल स्थान मिळवल्यानंतर एक पार्टी दिली होती. पार्टी रात्रभर सुरु होती. काही वेळाने जेष्ठ मंडळी निघून गेले आणि फक्त तरुण मंडळी पार्टीत होते. मग दंगा मस्ती वाढली. आवाज वाढला आणि तरुण मंडळी पॅलेसमधील स्वीमिंग पूलमध्ये उतरली."
परंतु, आमच्या मस्ती-मज्जेचा आवाज इतका होता की आम्हाला पार्टी बंद करण्यास सांगण्यात आले. पॅलेसमधील लोकांना आम्ही खूप समजवण्याचा प्रयत्न केला. माझ्या यशाची पार्टी असल्याचे देखील सांगितले. तरी देखील त्यांनी ऐकले नाही आणि आम्हाला पॅलेसमधून बाहेर पडावे लागले. असो. मात्र खूप मज्जा आली. "