मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीचे खेळाप्रती असलेली प्रतिबद्धता संघातील इतर खेळाडूंसाठी नक्कीच प्रेरणादायीच असल्याचे युवा क्रिकेटर सर्फराज खानने म्हटलंय. सर्फराज खान विराटच्या संघाचा महत्वाचा भाग आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये बंगळूरु संघाने युवा क्रिकेटर सर्फराज खानला कायम ठेवलेय. विराटने एकेकाळी लठ्ठ म्हणून सर्फराज खानला संघाबाहेर काढले होते मात्र याच सर्फराजने विराटच्या कमिटमेंटचे कौतुक केलेय.
स्टार स्पोर्टसद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सर्फराज म्हणाला, आम्ही विराट कोहलीला लहानपणापासून पाहिलेय. त्याच्यासोबत खेळणे आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. खेळाप्रती असलेली मेहनत आणि फिटनेसबाबतची जागरुकता इतर खेळाडूंसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. अनुभवी क्रिकेटर्स आणि प्रशिक्षकांकडून आम्हाला नेहमीच सकारात्मक राहण्याची प्रेरणा मिळते.
गेल्या वर्षी दुखापतीमुळे सर्फराज आयपीएल खेळू शकला नव्हता. यावर्षी तो याची भरपाई करण्यासाठी उत्सुक आहे.
सर्फराज खान तोच खेळाडू ज्याचे वजन जास्त असल्यामुळे विराटने त्याला संघात स्थान दिले नव्हते. पहिल्यांदा वजन कमी कर त्यानंतर संघात स्थान मिळेल असे विराटने त्याला सांगितले होते. त्यावेळी विराटचे ते बोलणे सर्फराजने मनावर घेतले आणि फिटनेसवर लक्ष केंद्रित केले.