Shahid Afridi On Virat Kohli In Pakistan: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. पाकिस्तानकडे यजमानपद असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताकडून या स्पर्धेसाठी दुबई किंवा श्रीलंकेच्या नाव सुचवलं जाणार आहे. भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यासाठी बीसीसीआय फारशी उत्सुक नाही. त्यामुळेच भारतीय संघ पाकिस्तानात जाण्यासंदर्भात शंका उपस्थित केली जात आहे. अशातच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने बीसीसीआयला असा विचार न करत उलट विचार करावा असा सल्ला दिला आहे. आफ्रिदीने भारतीय संघ पाकिस्तानमध्ये आला पाहिजे असं म्हटलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यामुळे केवळ दोन्ही देशांमधील क्रिकेटसंदर्भातील संबंध अधिक दृढ होतील याबरोबरच भारतीय संघ पाकिस्तानात आल्याच आणखी एक मोठा फायदा होईल असं आफ्रिदीने म्हटलं आहे. हा फायदा म्हणजे, पाकिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांना याची देही याची डोळा विराट कोहीला प्रत्यक्षात मैदानात खेळताना पाहता येईल, असं आफ्रिदीचं म्हणणं आहे.
भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या द्विपक्षीय मालिका 2013 पासून थांबवण्यात आल्या आहेत. यापूर्वी भारतीय संघाने 2006 साली पाकिस्तानचा शेवटचा दौरा केला होता. मागील वर्षी एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानी संघ भारतात आला होता. त्यामुळेच भारतीय संघ आता पाकिस्तानात जाऊन या दौऱ्याची परतफेड करेल असं मानलं जात होतं. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानेही भारतीय संघाच्या सुरक्षेच्या दृष्टीने केवळ लाहोरमध्येच सामने खेळवण्याचं नियोजन केलं होतं. भारत-पाकिस्तान बॉर्डरपासून हे शहर जवळच असल्याने इथे सामने खेळवण्याचं पाकिस्तानचं नियोजन होतं. मात्र एएनआयला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय संघाला पाकिस्तान पाठवण्यास उत्सुक नाही. त्याऐवजी मागील वर्षी खेळवलेल्या आशिया चषक स्पर्धप्रमाणे हायब्रीड पद्धतीने स्पर्धा खेळवण्याचा प्रस्ताव बीसीसीआय आयसीसीला देऊ शकते.
भारताने यापूर्वी पाकिस्तानचा शेवटचा दौरा केला त्यानंतर 2 वर्षांनी कोलहीने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यामुळे विराटने भारतासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये सामने खेळले असले तरी तो पाकिस्तानात खेळलेला नाही. त्यामुळेच कोहलीला प्रत्यक्षात खेळताना पाहण्यासाठी पाकिस्तानी चाहतेही फार उत्सुक आहेत. विराट कोहलीचा मोठा चाहता वर्ग पाकिस्तानमद्ये आहे. सध्या विराट 35 वर्षांचा असून चॅम्पियन्स ट्रॉफी हा विराटसाठी पाकिस्तानी दौऱ्याची शेवटची संधी असेल असं म्हटलं जात आहे. कोहलीने अंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो आता केवळ एकदिवसीय सामने आणि कसोटी खेळणार आहे.
नक्की पाहा हे फोटो >> 'सुंदर अशा...', शास्त्रींना अचानक जगातील सर्वात सुंदर टेनिसपटू भेटली अन्...; 'ती' पोस्ट Viral
या साऱ्याचा विचार करुनच शाहीद आफ्रिदीने भारताने पाकिस्तानात आलेच पाहिजे असं म्हटलं आहे. "मी भारतीय संघाचं पाकिस्तानमध्ये स्वागत करेन. पाकिस्तानचा संघ भारतात गेला होता तेव्हा त्यांना फार प्रेम आणि सन्मान मिळाला होता. तसेच 2005-2006 ला भारतीय संघ पाकिस्तानात आला होता तेव्हा सर्वच भारतीय खेळाडूंनी त्या दौऱ्याचा आनंद घेतला होता. भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांच्या देशात क्रिकेट खेळण्यासाठी जातात याहून मोठा शांततेचा संदेश दुसरा कोणताही नाही," असं शाहीद आफ्रिदी म्हणाला.
नक्की वाचा >> BCCI आणि गंभीरमध्ये वाजलं! नव्या कोचला एकामागोमाग 2 धक्के; 'हा' खेळाडू वादाचं कारण
विराटने आवर्जून पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यासाठी यावं याबद्दल बोलताना आफ्रिदीने, "विराट कोहली पाकिस्तानमध्ये आला तर भारतात त्याला मिळणारं प्रेम आणि आदरातीथ्य तो विसरुन जाईल (एवढं प्रेम त्याला इथे मिळेल) तो वेगळ्याच दर्जाचा खेळाडू आहे," असं म्हटलं. विराटची लोकप्रियता ही सीमेच्या पलीकडेही प्रचंड असल्याचं आफ्रिदीने पाकिस्तानमधील 'न्यूज 24' या वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या विधानामधून स्पष्ट केलं आहे.