वर्ल्ड कपमध्ये शमीची भूमिका महत्वाची - करसन घावरी

वर्ल्ड कपमध्ये शमीची कामगिरी ही निर्णायक आणि महत्वपूर्ण असेल, असे करसन घावरी म्हणाले.

Updated: Feb 7, 2019, 04:06 PM IST
वर्ल्ड कपमध्ये शमीची भूमिका महत्वाची - करसन घावरी  title=

मुंबई : गेल्या अनेक सीरिजपासून भारतीय टीम सातत्यानं यशस्वी कामगिरी करत आहे. या कामगिरीमुळे भारतीय टीमवर आणि खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताच्या या विजयात महत्वाचे योगदान बॉलरचं देखील आहे. त्यापैकी एक म्हणजे मोहम्मद शमी. भारताचे माजी फास्ट बॉलर करसन घावरी यांनी मोहम्मद शमीचं कौतुक केलं आहे. 

काही महिन्यांनी इंग्लंडमध्ये वर्ल्डकप स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेमध्ये मोहम्मद शमीची कामगिरी ही निर्णायक आणि महत्वपूर्ण असेल, असे करसन घावरी म्हणाले. प्रतिस्पर्धी टीमविरुद्ध बॉलिंग करताना, कशा प्रकारे गोलंदाजी करावी, कोणता बॉल टाकल्यावर बॅट्समनला खेळायला अडचण होईल, याचे सारे तंत्र शमीला अवगत आहे, अशी प्रतिक्रिया करसन घावरी यांनी दिली. 

शमी आणि वाद

शमीच्या गोलंदाजीत आधीपेक्षा आता फार सकारात्मक बदल झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून शमी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. मोहम्मद शमीच्या पत्नीनं त्याच्यावर महिलांसोबत अनैतिक संबंध, मारहाण आणि मॅच फिक्सिंगचे आरोप केले होते. यासर्व आरोपानंतर देखील शमीने जोरदार पुनरागमन करत चांगली कामगिरी केली. आपल्या क्रिकेट कारकीर्दीतील सर्वोत्तम बॉलिंग सध्या मोहम्मद शमी करत आहे. 

वर्ल्ड कपमध्ये, शमी आपले स्थान बनवण्यास प्रबळ दावेदार आहे का ? असा प्रश्न घावरी यांना विचारला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, "हो जवळपास, वर्ल्ड कपसाठी शमी टीममध्ये असायला हवा. इंग्लंडमधील परिस्थितीत शमी बॉलर म्हणून महत्वाची भूमिका बजावेल."  नुकत्याच न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात शमीने एकदिवसीय कारकीर्दीतील १०० विकेटचा टप्पा पूर्ण केला. भारताकडून सर्वात कमी सामन्यात १०० विकेट घेणाच्या रेकॉर्ड शमीनं केला. 

घावरी म्हणाले की, " शमीने गोलंदाजी करताना बॉलची दिशा आणि वेग कायम ठेवावा. याचा भारतीय टीमला लाभ होईल. शमीची बॉलिंग ही वैविध्यपूर्ण आहे. त्याला बॉल दोन्ही बाजूला फिरवता येतो. शमीनं यॉर्कर चेंडू टाकण्यासाठी अधिक मेहनत घ्यायला हवी. तसेच शमीच्या गोलंदाजीचा वेग आणि दिशा ही उत्तम आहे. तो आणखी चांगल्या प्रकारे गोलंदाजी करु शकतो."