मुंबई : 4 मार्च 2022 च्या दिवशी एक बातमी आली आणि प्रत्येक क्रिकेट चाहत्याला मोठा धक्का बसला. ही बातमी होती ऑस्ट्रेलियाचा महान स्पिनर शेन वॉर्न याच्या निधनाची. थायलंडमध्ये सुट्टीचा आनंद घेत असताना हार्ट अटॅकमुळे शेन वॉर्नचं निधन झालं. दरम्यान शेन वॉर्नने एक लक्ष्य ठरवलं होतं. येत्या जुलैपर्यंत त्याने ठरवलेलं हे लक्ष्य त्याला गाठायचं होतं. यानंतर तो सर्वांना याबाबत सांगणार होता.
शेन वॉर्नने काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं, ज्याला पाहून आता तो या जगात नाही यावर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे.
शेनने 28 फेब्रुवारी रोजी एक ट्विट केलं होतं. ट्विट केलेल्या फोटोमध्ये त्याने शर्ट घातलेलं नाही. पुन्हा असं फिट व्हायची इच्छा असल्याचं शेन वॉर्नने म्हटलं होतं.
Operation shred has started (10 days in) & the goal by July is to get back to this shape from a few years ago ! Let’s go #heathy #fitness #feelgoodfriday pic.twitter.com/EokgT2Hyhz
— Shane Warne (@ShaneWarne) February 28, 2022
वॉर्नने त्याच्या ट्विटमध्ये पुढे लिहिलं की, "येत्या 10 दिवसात मी माझ्या फिटनेसवर काम करणार आहे. जुलैपर्यंत हे लक्ष्य मला गाठायचं आहे. ऑपरेशन श्रेड (वजन कमी करणं) सुरु झालं आहे. आणि माझं लक्ष्य आहे की, काही वर्षांपूर्वी असलेल्या बॉडी शेपमध्ये येणं."
क्रिकेटच्या मैदानावर भलीमोठी कामगिरी करणाऱ्या आणि अनेक लक्ष्यं गाठणाऱ्या महान गोलंदाजाला हे लक्ष्य गाठता आलं नाही. जवळपास 15 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत शेकडो कामगिरी करणाऱ्या शेन वॉर्नची ही कामगिरी मात्र अधूरीच राहिली.