मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. यासाठी प्रत्येक टीमने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. मागच्या वर्षी फॉर्ममध्ये नसलेला महेंद्रसिंग वर्ल्ड कपआधी जबरदस्त फॉर्ममध्ये आला आहे. यामुळे भारतीय टीमची चिंता मिटली आहे. मागच्या वर्षी रनसाठी झगडणाऱ्या धोनीवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. या टीकाकारांवर ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉर्न चांगलाच भडकला आहे.
धोनीबद्दल बोलताना शेन वॉर्न म्हणाला, 'धोनी हा टीमच्या गरजेनुसार कोणत्याही क्रमांकावर बॅटिंग करू शकतो. तो एक महान खेळाडू आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळण्याची धोनीची क्षमता आहे, यामुळेच तो दुसऱ्यांपेक्षा वेगळा आहे. त्याच्यावर टीका करताना तुम्ही कोणाविषयी बोलत आहात, धोनीचं क्रिकेटमधलं योगदान काय आहे? याचा तरी विचार करावा.'
'मैदानात असताना गोष्टी तुमच्या मनासारख्या होत असतील तर कर्णधारपद भुषवणं सोपं असतं. पण जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असते तेव्हा धोनीसारख्या खेळाडूचा अनुभव कामाला येतो. कोहली हा चांगला कर्णधार असला, तरी त्याला अनेकवेळा धोनीच्या अनुभवाची गरज पडते. वर्ल्ड कपमध्ये कोहलीसोबत धोनीचा अनुभव निर्णायक ठरेल,' असं वक्तव्य वॉर्नने केलं.
आयपीएलची टीम राजस्थान रॉयल्सने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शेन वॉर्न बोलत होता. शेन वॉर्न हा राजस्थानच्या टीमचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर आहे. याआधी तो याच टीमचा कर्णधार आणि मग प्रशिक्षकही होता.