मोहाली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये शिखर धवननं शानदार १४३ रनची खेळी केली. मागच्या काही मॅचमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर शिखर धवननं या मॅचमध्ये शतक ठोकलं. मागच्या काही मॅचमधल्या खराब कामगिरीमुळे शिखर धवनवर टीका होऊ लागली होती. पण टीका करणाऱ्यांना मी महत्त्व देत नाही, असं धवन म्हणाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली १४३ रनची खेळी हा शिखर धवनचा वनडे कारकिर्दीमधला सर्वाधिक स्कोअर आहे.
'टीका करणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही. मी नेहमी माझ्याच विश्वात असतो, याचा मला मानसिकरित्या शांत राहण्यासाठी फायदा होतो. मी वृत्तपत्र वाचत नाही. त्यामुळे आजूबाजूला काय चाललं आहे, हे मला माहिती नसतं. मी स्वत:च्या विश्वात असतो. मला न पटणारे सल्ले मी ऐकत नाही,' असं शिखर धवन म्हणाला.
'धैर्य कायम ठेवतो तेव्हाच मी सर्वोत्तम कामगिरी करतो. दु:खी आणि अस्वस्थ राहण्यात काहीच अर्थ नसतो. लोक काय म्हणतात ते मला माहिती नसतं. कायम सकारात्मक राहण्यावर मी जोर देतो,' अशी प्रतिक्रिया शिखर धवननं दिली.
चौथ्या वनडेमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या विकेट कीपर ऋषभ पंत यालाही शिखर धवननं पाठिंबा दिला आहे. धोनीऐवजी शेवटच्या दोन मॅचमध्ये खेळणाऱ्या ऋषभ पंतनं चौथ्या वनडेमध्ये स्टम्पिंगची सोपी संधी सोडली. त्यावर बोलताना धवन म्हणाला 'कोणत्याही युवा खेळाडूला तुम्हाला वेळ द्यावा लागतो. धोनी एवढे वर्ष क्रिकेट खेळला आहे. त्याच्याशी तुम्ही ऋषभ पंतची तुलना करू शकत नाही. त्यानं स्टम्पिंग केला असता तर मॅचचा निकाल वेगळा लागला असता. पण मॅच आमच्या हातातून लवकर निसटली. मैदानात असलेल्या धुक्यानंही महत्त्वाची भूमिका बजावली,' असं वक्तव्य शिखर धवननं केलं.