...आणि शोएब अख्तरनं तो व्हिडिओ डिलीट केला!

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याच्यावर टीका करणारा एक व्हिडिओ डिलीट केला आहे.

Updated: Jan 23, 2019, 09:16 PM IST
...आणि शोएब अख्तरनं तो व्हिडिओ डिलीट केला! title=

मुंबई : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याच्यावर टीका करणारा एक व्हिडिओ डिलीट केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान सरफराज अहमदनं दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू ऍन्डिले फेहलुक्वायोबद्दल वर्णद्वेषी टिप्पणी केली होती. शोएब अख्तरनं सरफराजच्या वर्तनाचा निषेध म्हणून सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता.

काय होतं शोएबच्या व्हिडिओमध्ये?

मी तो व्हिडिओ बघितला नाही, पण सरफराजच्या वक्तव्याचा मी पाकिस्तानी म्हणून निषेध करतो. त्याला असं करायला नको होतं. सरफराजनं याप्रकरणी माफी मागावी असं शोएब अख्तर म्हणाला.

सरफराजचं हे वक्तव्य लाजीरवाणं आहे. कोणाच्याही वर्णावर एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणं चुकीचं आहे. सरफराज अहमदमुळे पाकिस्तानमधल्या अनेक युवा खेळाडूंना क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळते, अशी प्रतिक्रिया शोएब अख्तरनं दिली. सरफराज पाकिस्तानमधल्या अनेक युवकांचा रोल मॉडल आहे. चांगल्या गोष्टी बोलून तुम्ही संघाचं नेतृत्व करायला हवं. त्यामुळे लवकरच सरफराज माफी मागेल, अशी अपेक्षा शोएबनं या व्हिडिओतून व्यक्त केली होती.

काय म्हणाला सरफराज?

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानमधल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २०४ धावांचं आव्हान ठेवलं. या आव्हानचा पाठलाग करत असताना फेहलुक्वायो बॅटिंग करत होता, तेव्हा सरफराजनं वादग्रस्त वक्तव्य केलं. सरफराजनं फक्त फेहलुक्वायोवर वर्णावरून टीका केली नाही, तर त्याच्या आईबद्दलही काही शब्द वापरले. सरफराजचं हे वक्तव्य स्टम्प मायक्रोफोनमध्ये कैद झालं. 

सरफराजवर कारवाई होणार?

सरफराजनं केलेल्या या वक्तव्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आयसीसीच्या वर्णद्वेषविरोधी नियमांनुसार अंपायर आणि मॅच रेफ्री सरफराज अहमदवर कारवाई करू शकतात. आयसीसीच्या नियमानुसार आयसीसी आणि त्याचे सदस्य कोणाचाही जात, धर्म, संस्कृती, वर्ण, वंश, देश किंवा वंशीय मूळ यावरून अपमान करू शकत नाही. 

रमीझ राजाची सारवासारव

सरफराजनं हे वक्तव्य केलं तेव्हा माईक हेजमन आणि रमीझ राजा कॉमेंट्री करत होते. माईक हेजमन यांनी सरफराज नक्की काय म्हणाला? याबद्दल रमीझ राजा यांच्याकडे विचारणा केली. पण रमीझ राजा यांनी हसत या प्रश्नाच उत्तर देणं टाळलं. सरफराज काय म्हणला त्याचं भाषांतर करणं कठीण आहे. हे मोठं आणि दीर्घ वक्तव्य आहे, असं उत्तर रमीझ राजा यांनी दिलं.

दक्षिण आफ्रिकेचा विजय 

पाकिस्तानविरुद्धच्या या एकदिवसीय सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला. पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २०४ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना फेहलुक्वायोनं ८० बॉलमध्ये नाबाद ६९ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिल्यामुळे फेहलुक्वायोला सामनाविराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. या विजयामुळे ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेनं १-१नं बरोबरी साधली आहे.