मुंबई : टीम इंडिया सध्या न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 4 विकेट्स गामवत 258 धावा केल्या आहेत. या सामन्यात मोठे फलंदाज अपयशी ठरले असताना, पहिला सामना खेळणारा श्रेयस अय्यर 75 धावा करून नाबाद टिकून आहे. दरम्यान, श्रेयस अय्यरच्या वडिलांबाबतही एक धक्कादायक खुलासा झाला आहे.
श्रेयस अय्यरचे वडील संतोष यांचा व्हॉट्सअॅप डीपी गेल्या चार वर्षांपासून एकच फोटो आहे. त्यांच्या मुलाने 2017ची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी हातात घेतल्याचा हा फोटो आहे. त्यांनी गेल्या 4 वर्षात हा फोटो बदललेला नाही. याचं कारण म्हणजे आपल्या मुलाला कसोटी क्रिकेट खेळताना पाहण्याची त्यांची नेहमीच इच्छा होती.
श्रेयसने गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केलं तेव्हा त्याचे स्वप्न साकार झाले. अय्यरने नाबाद अर्धशतक झळकावून पहिली कसोटी अविस्मरणीय केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याच्या वडिलांनी सांगितलं की, "हा डीपी माझ्या मनाच्या फार जवळ आहे. धर्मशालामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना विराट कोहलीचा स्टँडबाय म्हणून तो संघात होता."
अय्यरचे वडील म्हणाले, "त्यावेळी सामना जिंकल्यानंतर त्याला ट्रॉफी दिली. ती ट्रॉफी त्याच्या हातात आहे आणि तो क्षण माझ्यासाठी अनमोल आहे. मी श्रेयसच्या भारताकडून कसोटी खेळण्याची वाट पाहत होतो."
"जेव्हा अजिंक्य रहाणे म्हणाला की तो खेळतोय तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता. आयपीएल, वनडे किंवा इतर कोणत्याही फॉरमॅटपेक्षा कसोटी क्रिकेट त्याने खेळावं ही माझी इच्छा होती.", असंही त्याचे वडील म्हणाले.
श्रेयसला सुनील गावस्कर यांच्याकडून कसोटी कॅप मिळाली हा त्याच्या वडिलांसाठी अभिमानाचा क्षण होता. ते म्हणाला, "सुनील गावसकर माझ्या आवडत्या क्रिकेटपटूंपैकी एक आहेत आणि हा अभिमानाचा क्षण होता. माझा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत."