चीनमध्ये वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, या स्पर्धेत सोमालियाच्या एका खेळाडूने अशी कामगिरी केली आहे, ज्यामुळे तिच्या देशाला जाहीर माफी मागावी लागली आहे. खेळाडूने केलेल्या लाजिरवाणी कामगिरीमुळे देशातील नागरिकही संतापले आहे. स्वत: क्रीडामंत्र्यांनी समोर येऊन जनतेची माफी मागितली आहे. पण नागरिकांचा संताप कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं जावं अशी मागणी जनता करत आहे.
चीनमध्ये 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचं आयोजन करण्यात आलं आहे. सोमालियाने यावेळी 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत आपली नवखी धावपटू नसरा अबुबकर अलीला मैदानात उतरवलं होतं. तिने या स्पर्धेत विजेत्या धावपटूच्या तुलनेत तब्बल दुप्पट वेळ घेतला. तेव्हापासूनच लोक संतापले असून क्रीडा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करत आहेत.
सोमालियाचे क्रीडामंत्री मोहम्मद बर्रे मोहम्मद यांनी नसरा अबुबकर अलीला या स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड केल्याबद्दल देशाची माफी मागितला आहे. रिपोर्टनुसार, नसरा अबुबकर अली हिच्याकडे अशा उच्चस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी लागणारा कोणताच अनुभव नव्हता.
वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समधील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत सोमालियान धावपटू नसरा अबुबकर अली 100 मीटर स्पर्धेत सहभागी झाल्याचं दिसत आहे. दरम्यान, स्पर्धा सुरु झाल्यानंतर सर्वात शेवटच्या नंबरला नसरा होती. सर्व खेळाडू रेषेपार गेल्यानंतरही नसरा मात्र मागे धावतच होती. यानंतर ती हसत हसत रेषा पार करते. रिपोर्टनुसार, 100 मीटरसाठी तिने 21.81 सेकंदाचा वेळ घेतला. विजेत्या धावपटूच्या तुलनेत ही वेळ दुप्पट होती.
#Somalia sorry for fielding record slow sprinter after Nasra Abubakar Ali took 22 seconds to complete the 100m sprint at the World University Games.
Sports Minister Barre Mohamud:“What happened was not representation of the Somali people, we apologise.”pic.twitter.com/tzqCfuta1p
— Oluwashina Okeleji (@oluwashina) August 2, 2023
सोमालियाचे क्रीडामंत्री मोहम्मद बर्रे मोहमूद यांनी हा पराभव फार लाजिरवाणा असल्याचं म्हटलं आहे. "चीनमध्ये जे काही झालं, ते सोमालीमधील जनतेचं प्रतिनिधित्व करत नाही. यासाठी मी सोमाली लोकांची माफी मागत आहे," असं ते म्हणाले आहेत.
Suspension of the Chairwoman of the Somali Athletics Federation, Ms. Khadijo Aden Dahir pic.twitter.com/UZsO0A4UiA
— Ministry of Youth and Sports of Somalia (@MoysFGS) August 2, 2023
धक्कादायक बाब म्हणजे नसराकडे अशा स्पर्धामध्ये सहभागी होण्याचा कोणताच अनुभव नव्हता. मात्र तरीही तिची इतक्या मोठ्या स्पर्धेसाठी निवड कशी झाली याचं आश्चर्य व्यक्त होत आहे.
सोमालियाच्या क्रीडा मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध करत याप्रकरणी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. 'द सोमाली एथलिट फेडरेशन'च्या प्रमुख खादिज अदेन दाहिर यांचं निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान, यामध्ये नसराची ओळख ना खेळाडू किंवा धावपटू म्हणून देण्यात आली आहे.
सोमालियन खेळाडूंमुळे असा वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये सोमालियचा धावपटू मैरीन नुह म्यूज याच्यावरुन वाद झाला होता. त्याने 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 1 मिनिट 10 सेकंदाचा वेळ घेतला होता. यातील सरासरी वेळ 48 सेकंद आहे. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये मोहम्मद फराह हिने 1 मिनिट 20 सेकंदाची वेळ घेतली होती. विजेत्याच्या तुलनेत तिने 30 सेकंद जास्त घेतले होते. यानंतर तिला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. महिलांनी खेळात सहभागी होऊ नये असं त्यांचं म्हणणं होतं.