मुंबई : आजच्याच दिवशी म्हणजेच 13 जुलै 2002 रोजी भारतीय संघाने नेटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा त्यांच्याच देशात पराभव केला होता. हा सामना भारताला जिंकणे सोपे नव्हते, कारण भारतापुढे मोठे लक्ष्य होते आणि चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही संघाची मधली फळी जास्त काळ पिचवर टिकू शकली नव्हती. या तिरंगी मालिकेची अंतिम लढत जिंकण्यासाठी भारतीय खेळाडूंना कठोर परिश्रम घ्यावे लागले आणि भारताने सामना जिंकताच कर्णधार सौरव गांगुलीने टी-शर्ट काढून तो फिरवला होता.
नेटवेस्ट ट्रॉफीसाठीची ही सिरीज भारत, श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात झाली होती. अंतिम सामन्यात भारत आणि यजमान इंग्लंडचा सामना लॉर्ड्सवर झाला होता. इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि स्कोअरबोर्डवर 325 धावांचं टार्गेट दिलं. ज्यात कर्णधार नासेर हुसेनचे 115 आणि मार्कस ट्रेस्कॉटिकचे 108 धावांचा समावेश होता. अँड्र्यू फ्लिंटॉफनेही 40 धावा केल्या. भारताकडून झहीर खानने 3 बळी घेतले तर आशिष नेहरा आणि अनिल कुंबळे यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. भारताला फक्त पाच गडी बाद करता आले होते.
दुसरीकडे कर्णधार सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवागने 326 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला चांगली सुरुवात दिली. दोघांनीही 14.3 षटकांत पहिल्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी केली. सौरव गांगुली 60 धावा काढून बाद झाला. यानंतर वीरेंद्र सेहवाग 45 धावांवर बाद झाला, दिनेश मोंगियाने 9 धावा केल्या, राहुल द्रविडने 5 धावा केल्या आणि सचिन तेंडुलकरने 14 धावा केल्या. 40 धावांच्या आत भारताचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. आता युवराज सिंगबरोबर क्रीजवर मोहम्मद कैफ होता, त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतका अनुभव नव्हता.
कैफ आणि युवराज यांच्यात 121 धावांची भागीदारी झाली, ज्याने विजयाच्या आशा निर्माण केल्या. दरम्यान, युवराज 69 धावांची खेळी खेळून बाद झाला. कैफने एका टोकाला संघाची बाजू धरुन ठेवली. हरभजन सिंग (15 धावा) आणि झहीर खान (4 धावा) यांच्यासह लहान भागीदारी करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले आणि त्यानंतर झहीर खानने विजयी शॉट मारुन भारताला 2 विकेटने विजयी केले. या विजयानंतर लगेचच कर्णधार सौरव गांगुलीने लॉर्ड्सच्या बालकनीत आपला टी-शर्ट काढून तो फिरवला.
#OnThisDay in 2002 Lord's, London
A moment to remember for #TeamIndia as the @SGanguly99-led unit beat England to win the NatWest Series Final pic.twitter.com/OapFSWe2kk
— BCCI (@BCCI) July 13, 2021
वास्तविक, सौरव गांगुलीच्या टी-शर्ट काढण्यामागचे कारण इंग्लंडचा खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफ होता. मुंबईत झालेल्या एका सामन्यांच्या मालिका बरोबरीत सुटल्याने अँड्र्यू फ्लिंटॉफने मैदानावर टी-शर्ट काढून आनंद साजरा केला होता. गांगुलीने त्याचे उत्तर देण्यासाठी असे केले. पण एका दशकापेक्षा जास्त काळानंतरही गांगुलीला या गोष्टीची खंत वाटते. कारण त्याला असं वाटतं की, आनंद साजरा करण्याचे इतर ही माध्यम होते.
माजी कर्णधार सौरव गांगुलीने त्यांच्या 'ए सेंचुरी इज नॉट इनफ' या आत्मचरित्रात आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील मनोरंजक घटनांबद्दल लिहिले आहे. त्याच पुस्तकात त्यांनी नेटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्याबद्दलही नमूद केले आहे आणि त्याचा टीशर्ट उतरवण्याविषयीही लिहिले आहे. गांगुलीने लिहिले की अंतिम सामन्यातील विजयाबद्दल संघ खूप उत्साही होता आणि झहीर खानने विजयी फटका मारताच मी स्वत: ला रोखू शकलो नाही. टी-शर्ट काढून सेलिब्रेट करणे योग्य नाही असेही ते म्हणाले. विजय साजरा करण्याचे आणखी बरेच मार्ग होते.
गांगुलीने पुस्तकाच्या लाँचिंगपूर्वी निवेदनात म्हटले होते की, 'टी-शर्ट काढून अँड्र्यू फ्लिंटॉफला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गांगुलीने सांगितले की 2002 मध्ये जेव्हा इंग्लंडचा संघ भारतात आला तेव्हा अँड्र्यू फ्लिंटॉफने हे काम केले होते. मग लॉर्ड्समधील अंतिम सामना जिंकल्यानंतर मीही असेच काही केले.'