मुंबई : भारताचा प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सौरव गांगुली यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. या वादाचा पुढचा अंक पुन्हा एकदा पाहायला मिळाला. गौरव कपूर याच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या वेब सीरिजमध्ये रवी शास्त्रीनं गांगुलीबद्दलचा एक किस्सा सांगितला होता. २००७ सालच्या बांगलादेश दौऱ्यावेळी बस सकाळी ९ वाजता हॉटेलमधून मैदानाकडे निघेल असं मी म्हणालो होते. त्याप्रमाणे ९ वाजता बस सुरु करायला सांगितलं. पण मॅनेजरनं सौरव गांगुली आला नसल्याचं कारण दिलं. तेव्हा बस सुरु करा गांगुली मागून गाडीनं येईल, असं सांगितल्याचं शास्त्री म्हणाला होता.
शास्त्रीचा हा दावा गांगुलीनं फेटाळून लावत रवी शास्त्रीला प्रत्युत्तर दिलं आहे. ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स याच कार्यक्रमात गांगुलीनं त्याची बाजू मांडली. रवी शास्त्रीची सकाळी मुलाखत घेऊ नकोस. सकाळी त्याला काहीच आठवत नाही. मी रवी शास्त्रीला भेटेलो की याबद्दल विचारीन. हा प्रकार कधीच झाला नव्हता. हे त्यानं कुठून सांगितलं माहिती नाही. पण यापुढे त्याची मुलाखत सकाळी नको तर संध्याकाळी घे कारण संध्याकाळी त्याला गोष्टी आठवतील, असा टोला गांगुलीनं लगावला आहे.
गांगुली आणि रवी शास्त्रीमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद सुरु आहेत. २०१६ साली रवी शास्त्रीला भारतीय टीमचा प्रशिक्षक होता आलं नाही. त्यावेळी शास्त्रीनं सौरव गांगुलीवर टीका केली होती. गांगुली हा प्रशिक्षक निवडण्याच्या समितीचा सदस्य होता. गांगुलीमुळेच माझी निवड झाली नसल्याचा आरोप शास्त्रीनं केला होता. तेव्हा शास्त्री मुर्खांच्या नंदनवनात राहत असल्याची टीका गांगुलीनं केली होती.
२०१७ साली विराट कोहलीबरोबर वाद झाल्यामुळे अनिल कुंबळेनं प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. यानंतर शास्त्रीनं पुन्हा एकदा प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला. यावेळी रवी शास्त्रीची भारताचा प्रशिक्षक म्हणून निवड झाली. शास्त्रीबरोबर विरेंद्र सेहवाग प्रशिक्षक बनण्याच्या शर्यतीत होता. रवी शास्त्री प्रशिक्षक झाल्यानंतर त्यानं भारत अरुण याची बॉलिंग प्रशिक्षक म्हणून निवड केली. २०१९ च्या वर्ल्ड कपपर्यंत रवी शास्त्री भारताचा प्रशिक्षक आहे.