विराट कोहलीला सलामीला पाठवण्याचा प्रयोग फसतोय का? कारकिर्दीत पहिल्यांदा 'ही' नकोशी कामगिरी

IND VS AUS : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सुपर-8 फेरीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. या शानदार विजयामुळे टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारलीय. पण या विजयानंतरही टीम इंडियाला एक चिंता सतावतेय.

राजीव कासले | Updated: Jun 25, 2024, 06:33 PM IST
विराट कोहलीला सलामीला पाठवण्याचा प्रयोग फसतोय का? कारकिर्दीत पहिल्यांदा 'ही' नकोशी कामगिरी title=

T20 World Cup : टी20 वर्ल्ड कप 2024 च्या सुपर-8 फेरीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव केला. टीम इंडियाने  (Team India) पहिली फलंदाजी करत 5 विकेट घेत 2025 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) 92 धावांची तुफानी खेळी केली. तर सुर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि हार्दिक पांड्यानेही त्याला चांगली साथ दिली. यानंतर भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाला 181 धावा करता आल्या. या विजयाबरोबरच टीम इंडियाने मोठ्या थाटात सेमीफायनलमध्य (T20 World Cup Semifinal) प्रवेश केला. आता सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची गाठ गतविजेत्या इंग्लंडशी पडणार आहे. (India vs England Semifinal)

टीम इंडियाला सतावतेय चिंता
पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शानदार विजयानंतरही टीम इंडियाला एका गोष्टीची चिंता सतावतेय. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) या टी20 वर्ल्ड कपमध्ये सपशेल अपयशी ठरतोय. विराट कोहलीला सलामीला पाठवण्याचा निर्णय चुकीचा ठरतोय का असा प्रश्न उपस्थित होतोय. आयपीएलमध्ये तुफान फॉर्मात असलेला विराट कोहलीने ऑरेंज कॅप पटकावली. त्यामुळे टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. टीम इंडियात रोहित शर्माबरोबर सलामीला पाठवण्याचा प्रयोग करण्यात आला. पण आतापर्यंत झालेल्या या सामन्यात हा प्रयोग सपशेल फसला आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुन्यावर बाद
सुपर-8 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीने भारताच्या डावाची सुरुवात केली. रोहित-विराट आक्रमक सुरुवात करतील अशी अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना होती. पण असं झालं नाही. विराट कोहली खातंही खोलू शकला नाही. विराट 5 चेंडू खेळला आणि शुन्यावर बाद झाला. क्रिकेट कारकिर्दीत पहिल्यांदाच इतकी खराब कामगिरी विराटच्या नावावर जमा झालीय.

विराट कोहली फ्लॉप
विराट कोहली या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत दुसऱ्यांदा शुन्यावर बाद झालाय. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत विराट कोहली आयसीसी स्पर्धेत तिनवेळा शुन्यावर बाद झालाय. यापैकी दोन वेळा यंदाच्या स्पर्धेतच तो अपयशी ठरलाय. 

सलामीला ठरतोय अपयशी
व्हाईट बॉल सामन्यात विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. पण य टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाने विराट कोहलीला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. पण विराट सलामीला सपशेल अपयश ठरतोय. या स्पर्धेत टीम इंडिया आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यात विराट कोहली चार वेळा धावांचा दुहेरी आकडाही गाठू शकलेला नाही. विशेष म्हणजे या स्पर्धेत विराटने एकही अर्धशतक केलेलं नाही. बांगलादेशविरुद्ध 37 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. सहा सामन्यात विराट कोहलीच्या नावावर 66 धावा जमा आहेत. 

विराटच्या नावावर नकोसा विक्रम
विराट कोहली टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी सरासरी असलेला भारतीय सलामीवीर बनला आहे. विराटची सध्याची सरासरी 11 आहे. याआधी हा विक्रम गौतम गंभीरच्या नावावर होता. 2012 मध्ये पहिल्या पाच डावात केवळ 16 च्या सरासरीने धावा करू शकला होता.