बॉलिंग प्रशिक्षकांना भारताचा हा खेळाडू वाटतोय अनलकी

भारत आणि वेस्ट इंडिजमधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला १२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

Updated: Oct 11, 2018, 05:14 PM IST
बॉलिंग प्रशिक्षकांना भारताचा हा खेळाडू वाटतोय अनलकी title=

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिजमधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला १२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी भारतीय टीमचे बॉलिंग प्रशिक्षक भरत अरुण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केएल राहुल हा असाधारण प्रतिभा असलेला खेळाडू आहे तर उमेश यादव कमनशिबी असल्याचं वक्तव्य अरुण यांनी केलं. मागच्या १६ इनिंगमधल्या १४ इनिंगमध्ये अपयशी ठरल्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा दौरा लक्षात घेता राहुलला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्येही संधी मिळेल, असं दिसतंय. तर जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्माच्या पुनरागमनानंतर उमेश यादवला त्याचं स्थान गमवावं लागू शकतं.

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये उमेश यादवला एक-एक टेस्टमध्येच संधी मिळाली होती. उमेशला दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये एक-एकच संधी मिळाली हे दुर्भाग्यपूर्ण आहे. दुसऱ्या बॉलरनी चांगली कामगिरी केल्यामुळे उमेशला एकच संधी मिळाल्याचं भरत अरुण म्हणाले. जलद बॉलिंग टाकणारा बॉलर म्हणून आम्ही उमेशकडे बघतोय. आम्ही बॉलरना विश्रांती द्यायचा प्रयत्न करतोय यामुळे बॉलर फिट आणि ताजेतवाने राहतील. उमेश यादव याचा हिस्सा आहे, अशी प्रतिक्रिया अरुण यांनी दिली. 

राहुल 'लंबी रेस का घोडा'

केएल राहुल सध्या अपयशी ठरत असला तरी तो लंबी रेस का घोडा आहे, असं मत भरत अरुण यांनी व्यक्त केलं. राहुलकडे असाधारण प्रतिभा आहे त्यामुळे त्याच्याकडे भविष्यातला सर्वोत्तम बॅट्समन म्हणून बघितलं पाहिजे आणि त्याला संधी दिली पाहिजे, असं भरत अरुण यांना वाटतंय.