मुंबई : टीम इंडियाची माजी कर्णधार मिताली राजने गेल्याच महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती.यानंतर असंख्य क्रीडाप्रेमींना धक्का बसला होता.मात्र आता मिताली राजने पुन्हा मैदानात परतण्याचे संकेत दिले आहेत.त्यामुळे क्रीडाप्रेमींना पुन्हा मैदानात फटकेबाजी करताना पाहता येणार आहे.
बहुप्रतिक्षित महिला आयपीएल पुढच्या वर्षी सुरू होणार आहे. या आयपीएलमध्ये मिताली राज एक खेळाडू म्हणून सहभागी होऊ शकते, असे संकेत तिने दिले आहेत. त्यामुळे तिला पुन्हा एकदा मैदानात पाहता येणार आहे.
आयसीसीच्या नवीन पॉडकास्ट 100 पर्सेंट क्रिकेटच्या पहिल्या एपिसोडवर बोलताना मिताली राज म्हणाली, मी तो पर्याय खुला ठेवला आहे. मी अजून ठरवले नाही. महिला आयपीएल होण्यासाठी काही महिने बाकी आहेत. महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामाचा भाग व्हायला आवडेल, असेही ती म्हणाली आहे.
कारकिर्द
जगातील महान महिला क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या मिताली राजने जूनमध्ये तिची 23 वर्षांची कारकीर्द संपवली. मिताली राजने 232 सामन्यात 50 पेक्षा जास्त सरासरीने 7805 धावा केल्या आहेत. उजव्या हाताच्या महिला फलंदाजाने 89 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2364 धावा केल्या, तर 12 कसोटी सामन्यांमध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांच्या मदतीने 699 धावा केल्या.