पोर्ट ऑफ स्पेन : वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला धमकी मिळाल्यानंतर संपूर्ण टीमची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. वेस्ट इंडिजमध्ये असलेल्या टीम इंडियाला धोका असल्याची एक खोटी बातमी बीसीसीआयला मिळाली होती. या बातमीमध्ये कोणतंही तथ्य नाही, तरी भारतीय टीमला अतिरिक्त सुरक्षा देण्यात आली आहे, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
'ही बातमी खोटी होती आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. तरीही भारतीय टीमला अतिरिक्त सुरक्षा देण्यात आली आहे. तसंच कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी भारतीय उच्चायोगाने एंटीगा सरकारलाही याबाबत सूचना दिली आहे.', असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.
टीम इंडियाला देण्यात आलेल्या धमकीचा हा मेल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पाठवण्यात आला. यानंतर पीसीबीने हा मेल बीसीसीआय आणि आयसीसीला पाठवला. बीसीसीआयने याबाबतची सूचना गृहमंत्रालयाला दिली. पण आयसीसी आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने ही अफवा असल्याचं स्पष्टीकरण दिलं. बीसीसीआयनेही आता या बातम्यांचं खंडन केलं आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये टीम इंडियाने टी-२० आणि वनडे सीरिज जिंकली आहे. यानंतर आता २ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. पहिली टेस्ट २२ ऑगस्टपासून आणि दुसरी टेस्ट ३० ऑगस्टपासून सुरु होईल.