नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अलीकडेच टी -20 फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. आगामी टी 20 विश्वचषक 2021 मध्ये तो अखेरीच्या वेळी भारताचं नेतृत्व करताना दिसणार आहे. पण आता अशी गोष्ट समोर आली आहे की कसोटी संघातील अनेक वरिष्ठ खेळाडू देखील विराट कोहलीच्या वृत्तीवर नाराज होते. याबद्दल त्यांनी बीसीसीआयकडे तक्रार केली होती. ज्या खेळाडूंनी तक्रार केली आहे त्यांच्यामध्ये रविचंद्रन अश्विनचं नाव ठळकपणे समोर येतंय.
गेल्या काही महिन्यांत विराटच्या वागण्यासंदर्भात संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये काही समस्या समोर येत होत्या. बीसीसीआयला विराट कोहलीच्या वर्तनाबद्दल यापूर्वी अनेक वेळा वेगवेगळ्या खेळाडूंकडून तक्रारी आल्या होत्या आणि त्याला कर्णधारपदावरून हटवण्याचा विचार केला जात होता. मात्र, फलंदाजीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं सांगत विराटने स्वतःच टी -20 फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली.
IANS मधील एका अहवालात म्हटलं आहे की, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान विराट कोहलीने अश्विनला सांगितलं की, तो खेळावर लक्ष केंद्रित करत नाही. यानंतर अश्विनने बोर्डाचे सचिव जय शाह यांना सांगितलं की, विराट त्याच्या वृत्तीने मला 'असुरक्षित' करण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यानंतर अंतिम सामन्यात अश्विन हा एकमेव प्रभावी गोलंदाज असल्याचं दिसून आलं. त्याने स्विंग गोलंदाजीच्या आधार देणाऱ्या खेळपट्टीवरही विकेट घेतल्या. साऊथम्प्टनमध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात इतर कोणताही भारतीय गोलंदाज विकेट घेऊ शकला नाही.