Sania Mirza Earning: भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने (Sania Mirza) आपल्या टेनिस कारकिर्दीला पूर्णविराम लावला आहे. मंगळवारी टी डब्ल्यूटीए दुबई ड्युटी फ्री चॅम्पियनशीपमधील पहिल्या टप्प्यामध्ये सानिया आणि तिची अमेरिकी जोडीदार मॅडिसन कीज कोर्टवर उतरले होते. या दोघांनी रशियाच्या वेरोनिका कुदेरमेतोवा आणि ल्यूडमिला सॅमसोनोवा यांनी 6-4, 6-0 ने पराभूत केलं. या पराभवाबरोबरच 36 वर्षीय सानिया मिर्झाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली. सानिया मागील 20 वर्षांपासून टेनिस खेळत होती. सानियाने 2003 साली पहिल्यांदा प्रोफेशनल टेनिस सामना खेळली.
सानिया मिर्झाने आपल्या करियरमध्ये एकूण 6 ग्रॅण्डस्लॅम आणि 43 डबल्सच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. या कालावधीमध्ये तिने विजयी खेळाडू म्हणून बक्षिसांच्या स्वरुपात बरेच पैसे कमवले आहेत. वुमन्स टेनिस असोसिएशनच्या वेबसाईटनुसार 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत सानिया मिर्झाने कमवलेली बक्षिसाची एकूण रक्कम 60 कोटी रुपयांहून अधिक आहे.
या वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांमध्येच सानियाने प्राइज मनीच्या माध्यमातून 16 लाखांहून अधिक रुपयांची कमाई केली. वेबसाईटवरील माहितीनुसार 2008 मध्ये सानिया मिर्झाने 8 कोटींहून अधिक रक्कम प्राइज मनी म्हणून जिंकली होती.
सानियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये, "जे लोक स्वत:च्या पद्धतीने काम करण्याची हिंमत ठेवतात त्यांना समाजातून विरोध स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. एखाद्या व्यक्तीला नायक आणि दुसऱ्याला खलनायक दाखवण्याचे प्रकार बंद केले पाहिजे," असं मत व्यक्त केलं. "मी कोणतेही नियम मोडलेत असं मला वाटत नाही. मी माझ्या खेळाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला. मी नेहमीच हा प्रयत्न करते. मी स्वत:शी प्रामाणिक राहाण्याचा प्रयत्न करते. मी आयुष्य माझ्या धोरणांनुसार जगण्याला प्राधान्य देणारी आहे," असंही सानियाने खेळाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
"मला वाटतं प्रत्येकाला हे असं करणं जमलं पाहिजे. तसेच आपणही इतरांना असं वागण्याचं स्वातंत्र दिलं पाहिजे. तुम्ही अमुक एखादा ट्रेण्ड सेट करत आहात असं आपण कोणालाही म्हणता कामा नये. तुम्ही नियम मोडू शकता. तुमच्या दृष्टीने मी साचेबद्धपणे वागत नसेल किंवा माझं वागणं तुम्हाला वेगळं वाटतं असेल पण यासाठी तुम्ही मला विद्रोही असल्याचा ठपका लावू शकत नाही," असंही सानियाने म्हटलं.