शेवटी धोनीचाच चेला! सॅम करन 'मॅन ऑफ द टुर्नामेंट' ठरल्यावर माहीसुद्धा ट्रेंडमध्ये

'माही सबपे भारी', IPL मधील धोनीच्या हुकमी एक्क्याने पाकिस्तानचा उडवला धुव्वा

Updated: Nov 13, 2022, 11:15 PM IST
 शेवटी धोनीचाच चेला! सॅम करन 'मॅन ऑफ द टुर्नामेंट' ठरल्यावर माहीसुद्धा ट्रेंडमध्ये title=

Eng vs Pak : इंग्लंड संघाने पाकिस्तानवर फायनलमध्ये विजय मिळवत दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं आहे. आजच्या सामन्यानंतर सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे सॅम करन. कारण पहिलाच वर्ल्ड कप खेळताना फायनल सामन्याचा 'मॅन ऑफ द मॅच' आणि 'मॅन ऑफ द टुर्नामेंट' अशा दोन पुरस्कारांची माळ पठ्ठ्याच्या गळ्यात पडली आहे. सॅम करनला हे दोन मोठे किताब मिळाल्यावर भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनी ट्रेंडमध्ये आला. (Dhoni came into the trend when Sam Curran became Man of the Tournament marathi Sport news)

धोनी ट्रेंडमध्ये येण्याचं नेमकं कारणं काय? 
महेंद्र सिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी IPL खेळत आहे. आयपीएलमध्ये धोनीने अनेक खेळाडू तयार केले. यामध्ये सॅम करनचाही समावेश आहे. कारण धोनीने या तरण्या पोराला पॉवरप्लेमध्येही गोलंदाजी करायला दिली. त्यासोबतच डेथ ओव्हर्समध्येही त्याला आजमावलं. याचा फायदा असा झाला की करनलाही दबावामध्ये दमदार प्रदर्शन करण्याची सवय लागली. 

अनुभव फारसा नसल्याने कित्येकवेळा युवा खेळाडू प्रतिभा असतानाही दबावाचे बळी ठरतात. मात्र गुरू धोनीने त्याच्या तालमीमध्ये या पोराला तयार केलं होतं. यामुळे सॅम करनचं इंग्लंड संघात स्थान पक्क झालं आणि आजच्या सामन्यात तर त्याने पाकिस्तानचे सर्वाधिक गडी बाद करत जलवा दाखवून दिला. रन मशिन आणि मैदानावर तळ ठोकून बसणाऱ्या मोहम्मद रिझवानला त्याने बोल्ड आऊट केलं. त्यासोबतच आणखी दोन विकेट्स घेतल्या.

आयपीएलमध्ये धोनीने दीपक चहर, शार्दुल ठाकुर अनेक युवा खेळाडूंना संधी दिलेली पाहायला मिळालं. त्या खेळाडूंनीही धोनीचा विश्वास सार्थ ठरवत त्यांची उपयुक्तता दाखवून दिली. त्यामुळे सॅम करन 'मॅन ऑफ द टुर्नामेंट' झाला तर आपला माही ट्रेंडमध्ये आला तर वावगं वाटायला नको.