हरिश मालुसरे, झी मीडिया : Gaaba Test Victory 2 years : आज भारतीय क्रिकेटच्या ऐतिहासिक विजयाला दोन वर्षे पूर्ण झालीत. ऑस्ट्रेलिया संघ ज्या 'गाबा' मैदानावर अजिंक्य होता त्याच बालेकिल्ल्यावर भारताच्या तरण्या पोरांनी कांगारूंची ठासून जिरवली होती. ऋषभ पंतचा तो विजयी चौकार अविस्मरणीय असून क्रीडा विश्वातील प्रत्येकाच्या मनात राहिला आहे. हा विजय फक्त विजय नव्हता, एखाद्या युद्धाप्रमाणे मालिकेची अवस्था झाली होती. (Two years after Gabba test historic victory young players had thrashed the Kangaroos)
मालिकेच्या चार सामन्यांमधील पहिला सामना भारताने 8 धावांनी विजय मिळवला होता. त्यावेळचा कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर भारतात परतला होता. विराट गेल्यावर टीम इंडियाचा संघ दुबळा झाला होता, अनेक क्रिकेट पंडितांनी भारत 4-0 ने पराभूत होणार अशा भविष्यवाण्या केल्या होत्या मात्र त्यानंतर जे झालं ते अख्ख्या जगाने पाहिलं.
भारताने पहिला सामना गमावल्यानंतर अजिंक्य रहाणेकडे संघाची धुरा सोपवण्यात आली होती. दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेने शतकी खेळी केली होती. भारताने हा सामना आपल्या खिशात घालत मालिकेमध्ये बरोबरी 1-1 साधली. टीम इंडियाला अंगात चिलखत घातल्यासारखं झालं. आता तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये झाला ज्यामध्ये दोन्ही संघाच्या खेळाडूंनी दमदार खेळ दाखवला.
ऑस्ट्रेलियाने भारताला 497 धावांचं लक्ष्य ठेवलं होत, तिसऱ्या सामन्यामध्ये हनुमा विहारी आणि आर. आश्विन यांनी चिवट फलंदाजी करत सामना रद्द केला होता. या सामन्यामध्ये जिगरबाज ऋषभ पंतने 97 धावांची खेळी करत टीम इंडियाच्या विजयाच्या आशा जागवल्या होत्या. तीन सामन्यांमध्ये आता 1-1 ने बरोबरी झाली होती. टीम इंडियाचा संघातील अनेक खेळाडू जखमी झाले होते. यामध्ये महत्त्वाचे मोहरे आर आश्विन, मोहम्मद शमी, हनुमा विहारी आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश होता.
चौथ्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियामध्ये दोन नवख्या तरूण खेळाडूंना संधी मिळाली होती. शेवटचा सामाना गाबाच्या मैदानावर होता, जिथे भारताने कधी एकही सामना जिंकला नव्हता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांगारू त्या मैदानावर गेल्या 31 वर्षांपासून अजिंक्य होते. त्यामुळे खेळण्याआधी नव्या दमाच्या पोरांवर रेकॉर्डचं मोठं ओझ होतं.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला. मार्नुस लाबुशेनच्या शतकाच्या जोरावर 369 धावांचा डोंगर उभारला. भारताकडून 'लॉर्ड' शार्दुल ठाकुर 67 आणि वॉशिंग्टन 62 धावा करत संघर्ष केला. भारताचा पहिला डाव 336 धावांवर आटोपला होता.
दुसऱ्या डावात 33 धावांची आघाडी घेत मैदानावर उतरलेल्या कांगारूंना भारतीय बॉलर्सनी आपले पाय रोवून दिले नाहीत. मोहम्मद सिराजने 5 आणि शार्दुल ठाकूरने 4 विकेट्स घेत 294 धावांवर रोखलं. भारताला मालिका आणिआ ऐतिहासिक विजयासाठी 328 धावांचं लक्ष्य होतं. भारताकडून शुभमन गिलने चांगली सुरूवात केली. रोहित शर्मा स्वस्तात परतला होता त्यानंतर आलेल्या भारताचा आधारस्तंभ म्हणून ओळख असलेल्या पुजारानेही अर्धशतक पूर्ण केलं मात्र त्याला कमिन्सने 56 धावांवर बाद केलं.
पुजारा बाद झाल्यावर रहाणेही 24 धावा करून परतला. मयांक अग्रवाल 9 धावा, वॉशिंग्टन सुंदर 22 धावा त्यानंतर आलेला शार्दुलही 2 धावा करून बाद झाला. मात्र एखाद्या योद्ध्यासारखा पंत मैदानावर टिकून होता, पंतने सामना पूर्णपणे टीम इंडियाच्या पारड्यात झुकवला.
दरम्यान, टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयाला आज दोन वर्षे पूर्ण झाली. या सामन्याचा खरा हिरो अपघातामुळे दवाखान्यात असला तरी तो लवकरच पुन्हा परतणार आहे.