पॉटचेफस्टरूम : अंडर-१९ वर्ल्ड कपच्या फायनलच्या दोन्ही टीम निश्चित झाल्या आहेत. रविवारी भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. अंडर-१९ वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये बांगलादेशने न्यूझीलंडचा ६ विकेटने पराभव केला आणि फायनल गाठली. याआधी पहिल्या सेमी फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती.
न्यूझीलंडने दिलेल्या २१२ रनच्या आव्हानाचा पाठलाग बांगलादेशने ४४.१ ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून केला. महम्मदूल हनस जॉयने शतकी खेळी केली. सर्वाधिक १०० रन करुन जॉय माघारी परतला. तौहीद हृदोयने ४० आणि शहादत हुसेनेने नाबाद ४० रन केले. न्यूझीलंडच्या ख्रिश्चन क्लार्क, डेव्हिड हॅन्कॉक, आदित्य अशोक आणि जीस टॅशकॉफला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.
बांगलादेशने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर बांगलादेशच्या बॉलरनी न्यूझीलंडला ५० ओव्हरमध्ये २११ रनवर रोखलं. न्यूझीलंडच्या बेकहॅम व्हीलर-ग्रीनॉलने सर्वाधिक नाबाद ७५ रन केले. निकोलास लिडस्टोनला ४४ रन करता आले. बांगलादेशने न्यूझीलंडच्या ८ खेळाडूंना आऊट केलं. शोरीफूल इस्लामने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. शमीम हुसेनला आणि हसन मुरादला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. तर रकीबूल हसनला एक विकेट घेण्यात यश आलं.
भारत आणि बांगलादेश यांच्यात रविवार ९ फेब्रुवारीला अंडर-१९ वर्ल्ड कपची फायनल खेळवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता हा सामना सुरु होईल. याआधी २०१८ साली झालेल्या अंडर-१९ वर्ल्ड कपवरही भारताने नाव कोरलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा ही ट्रॉफी आपल्याकडेच कायम ठेवण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल.
भारतीय टीमने आतापर्यंत ४ वेळा अंडर-१९ वर्ल्ड कप जिंकला आहे. २०००, २००८, २०१२ आणि २०१८ साली भारताने अंडर-१९ वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं होतं.
अंडर-१९ वर्ल्ड कप : पाकिस्तानला धूळ चारण्यात भारत 'यशस्वी', फायनलमध्ये धडक