मराठमोळ्या कर्णधाराची ऐतिहासिक कामगिरी, आणखी एक देशाला वनडेचा दर्जा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने आणखी दोन देशांना आंतरराष्ट्रीय वनडे टीमचा दर्जा दिला आहे.

Updated: Apr 25, 2019, 06:23 PM IST
मराठमोळ्या कर्णधाराची ऐतिहासिक कामगिरी, आणखी एक देशाला वनडेचा दर्जा title=

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने आणखी दोन देशांना आंतरराष्ट्रीय वनडे टीमचा दर्जा दिला आहे. अमेरिका आणि ओमान या दोन्ही टीमनी आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन २ मध्ये शानदार कामगिरी केली. अमेरिकेला १५ वर्षानंतर वनडेचा दर्जा मिळाला आहे. याआधी २००४ साली अमेरिकेला हा दर्जा मिळाला होता. त्यावेळी अमेरिका चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी झाली होती.

मराठमोळा कर्णधार सौरभ नेत्रावळकरच्या नेतृत्वात खेळताना अमेरिकेने हाँगकाँगचा पराभव केला. पहिले बॅटिंग करणाऱ्या अमेरिकेने झेवियर मार्शलच्या शतकाच्या जोरावर ५० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून २८० रन केले. या मॅचमध्ये सौरभ नेत्रावळकरने उल्लेखनीय कामगिरी केली. सौरभने ५ ओव्हरमध्ये फक्त १४ रन देऊन १ विकेट घेतली. अमेरिकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना हाँगकाँगला १९६/७ एवढीच मजल मारता आली.

तर दुसरीकडे ओमानने रोमांचक मॅचमध्ये नामिबियाचा पराभव केला. अमेरिका आणि ओमानची टीम लीग-२ मध्ये स्कॉटलंड, नेपाळ आणि युएई यांच्यासोबत आली आहे. पुढच्या अडीच वर्षात या टीम एकूण ३६ मॅच खेळतील.

आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन-२ मध्ये ओमानची टीम चार पैकी चार मॅच जिंकत ८ पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर अमेरिकेने पराभवापासून सुरूवात केली, तरी त्यांना वनडे क्रिकेटचा दर्जा मिळाला. अमेरिकेने ४ पैकी ३ मॅचमध्ये विजय मिळवला. ६ अंकांसह अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. नामिबिया तिसऱ्या, हाँगकाँग चौथ्या, कॅनडा पाचव्या आणि पपुआ न्यू गिनी सहाव्या क्रमांकावर आहेत.