Danish Kaneria Slam Babar Azam : पाकिस्तानच्या खराब कामगिरीमुळे सध्या बाबरसेना क्रिडाविश्वात चर्चेचा विषय आहे. दुबळ्या युएसएकडून पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. तो ही सुपर ओव्हरमध्ये... पाकिस्तानला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) याच्यावर जोरदार टीका झाली. अशातच आता सध्या भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी (IND Vs PAK) बाबर आझमची तुलना विराट कोहलीसोबत (Virat Kohli) केली जाऊ लागली आहे. अशातच आता पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कनेरियाने (Danish Kaneria) याने थेट बाबर आझमची इज्जतच काढली आहे.
काय म्हणाला Danish Kaneria?
पाकिस्तान क्रिकेट संघ म्हणजे एक जोक आहे, टी-ट्वेंटी विश्वचषकाबद्दल पाकिस्तानचा संघ गंभीर दिसत नाहीये. चांगला संघ असून देखील ते चांगलं योगदान देत नाहीयेत. ते फक्त कुटुंबासह यूएसमध्ये सुट्टी घालवत आहेत, अशी टीका दानिशने केली. त्यावेळी त्याने बाबर आझमला धारेवर धरलं. बाबर आझम विराट कोहलीजवळ कुठंही उभा नाही. विराट के जुटे के बराबर भी नहीं है, असं म्हणत दानिश कनेरियाने बाबर आझमवर खणखणीत टीका केली आहे.
बाबर आझम एखाद्या किरकोळ संघाविरुद्ध शतक ठोकतो, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुम्हा त्याची तुलना विराट कोहलीसोबत करता. विराट के जुटे के बराबर भी नहीं है बाबर, असं दानिश कनेरिया म्हणाला. युएसएविरुद्ध तुम्हाला उत्तम फलंदाजी करता आली नाही. युएसएविरुद्धच्या सामन्यात तो सामना जिंकवू शकला असता. मात्र तो युएसएच्या गोलंदाजांना खेळू शकला नाही. तो 40 धावा केल्यानंतर, चांगली सुरूवात मिळाल्यानंतर बाबर बाद झाला. बाबर एकटा उभा राहिला असता तरी देखील सामना जिंकला असता. त्याने तसं करायला पाहिजे होतं, असं स्पष्ट मत दानिश कनेरियाने मांडलं आहे.
दरम्यान, पाकिस्तानविरुद्ध विराट कोहली नेहमी आग ओकतो. भारत-पाकिस्तान मॅचमध्ये सर्वांच्या नजरा आहेत त्या विराट कोहलीवर... टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरोधात विराटची बॅट नेहमीच तळपत असते... त्याने आतापर्यंत 10 मॅचमध्ये पाकिस्तानच्या बॉलरला सळो की पळो करून सोडलंय. कोहलीनं 81.33च्या सरासरीनं 488 रन्स केलेत. त्यात 5 अर्धशतक झळकावलेत. कोहलीच्या तुलनेत हिटमॅन रोहित शर्माची पाकिस्तानविरुद्धची कामगिरी निराशजनक ठरलीय. त्याने 11 मॅचमध्ये 14.25 च्या सरासरीनं केवळ 114 रन्स केलेत. मात्र, आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक ठोकत रोहित शर्मानं टी-20 वर्ल्डकपमध्ये दमदार सुरुवात केलीय. त्यामुळे आजच्या रोहितच्या बॅटिंगकडं त्याचे चाहते लक्ष लावून बसलेत.