एकाच वर्षात आफ्रिका-इंग्लंड-ऑस्ट्रेलियात विजय, विराट पहिला आशियाई कर्णधार

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननं विजय झाला.

Updated: Dec 10, 2018, 05:06 PM IST
एकाच वर्षात आफ्रिका-इंग्लंड-ऑस्ट्रेलियात विजय, विराट पहिला आशियाई कर्णधार title=

ऍडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननं विजय झाला. या विजयाबरोबरच भारतानं ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये १-०नं आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या मैदानात पहिलीच टेस्ट मॅच जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. ऍडलेडमध्ये भारतानं २००३ साली टेस्ट मॅच जिंकली होती. तर ऑस्ट्रेलियामध्ये १० वर्षानंतर भारताला टेस्ट मॅच जिंकता आली. २००८ साली भारतानं पर्थमधली टेस्ट मॅच जिंकली होती.

ऍडलेडमधल्या या विजयाबरोबरच कर्णधार विराट कोहलीनं आणखी एक रेकॉर्ड त्याच्या नावावर केलं आहे. विराट कोहली हा आशिया खंडातला पहिला कर्णधार आहे, ज्यानं एकाच वर्षामध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या टेस्ट मॅच जिंकल्या.

भारताचे २०१८ मधले परदेशातील विजय

जानेवारी- जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेला ६३ रननी हरवलं

ऑगस्ट- नोटिंगहममध्ये इंग्लंडचा २०३ रननी पराभव केला

डिसेंबर- ऍडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाला ३१ रननी हरवलं

लागोपाठ ३ वर्ष विराटच्या २,५०० रन

विराट कोहली हा सध्या जगातला सर्वोत्तम बॅट्समन आहे. मागच्या १० वर्षांमध्ये विराटनं स्वत:च्या खेळाचा दर्जा वारंवार उंचावला आहे. ऍडलेडमधल्या टेस्ट मॅचमध्ये विराटला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. या मॅचमध्ये विराट पहिल्या इनिंगमध्ये ३ रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ३४ रन करून आऊट झाला. याचबरोबर विराट हा क्रिकेट इतिहासातील पहिला बॅट्समन बनला आहे, ज्यानं लागोपाठ ३ वर्ष २,५०० रनपेक्षा जास्त रन केले आहेत. विराटनं २०१६ साली २,५९५ रन आणि २०१७ मध्ये २,८१८ रन केले होते. यावर्षी विराटनं आत्तापर्यंत २,५१३ रन केले आहेत.

पाकिस्ताननंतरची पहिली टीम

ऍडलेड टेस्ट जिंकल्यानंतर भारत पाकिस्ताननंतरचा पहिला देश बनला आहे, ज्यानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली पहिली टेस्ट मॅच जिंकली आहे. याआधी पाकिस्ताननं १९७८-७९ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली पहिली टेस्ट मॅच जिंकली होती.

सगळ्यात जलद एक हजार रन

विराट कोहली ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्यात जलद एक हजार टेस्ट रन पूर्ण करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एक हजार टेस्ट रन पूर्ण करणारा विराट पाचवा भारतीय खेळाडू आहे. विराटआधी सचिन तेंडुलकर(१,८०९ रन), व्हीव्हीएस लक्ष्मण (१,२३६ रन), राहुल द्रविड (१,१४३ रन) आणि वीरेंद्र सेहवाग (१,०३१ रन) यांनी ऑस्ट्रेलियात एक हजार रनचा टप्पा ओलांडला होता. सेहवागच्या ऑस्ट्रेलियामध्ये १,०३१ रन असल्या तरी यामध्ये जागतिक-११ कडून केलेल्या ८३ रनचाही समावेश आहे.

ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच पहिली टेस्ट जिंकला भारत

७१ वर्षांमध्ये भारत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली पहिली टेस्ट मॅच जिंकला आहे. भारतानं आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाचे ११ दौरे केले आहेत. भारत-ऑस्ट्रेलियातल्या सीरिजला १९४७-४८मध्ये सुरुवात झाली होती. तेव्हापासून भारत कधीच दौऱ्यातली पहिली टेस्ट मॅच जिंकली नाही. ऑस्ट्रेलियामध्ये भारतानं आत्तापर्यंत ४५ टेस्ट मॅच खेळल्या, यातल्या ६ टेस्ट मॅचमध्ये भारताचा विजय झाला. ऍडलेडच्या मैदानात भारताचा हा दुसरा विजय आहे. या मैदानात भारतानं ७ टेस्ट मॅच गमावल्या आणि ३ टेस्ट मॅच ड्रॉ झाल्या.