T20 World Cup 2024 : टीम इंडियासाठी खोऱ्याने धावा करणारा विराट कोहली (Virat Kohli) आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपला मुकणार की काय? असा सवाल विचारला जात आहे. निवड समिती आणि संघ व्यवस्थापन विराटला जूनमध्ये होणाऱ्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) स्पर्धेत संघात घेण्यात इच्छुक नाहीत, अशी माहिती समोर आली होती. विराट कोहली मागील टी-ट्वेंटी वर्ल्ड कप नंतर या फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे आता विराट फक्त वनडे क्रिकेटवर फोकस करणार की काय? असा सवाल विचारला जात आहे. मात्र, पंजाब किंग्ज आणि आरसीबी (PKBS vs RCB) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर विराट कोहलीने टी-ट्वेंटी वर्ल्ड खेळणार असल्याचं सांगितलं आहे.
नेमकं काय म्हणाला विराट कोहली?
रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलचा 6 वा सामना खेळवला गेला. या सामन्यात आरसीबीने पंजाबचा 4 गडी राखून पराभव केला. विराट कोहलीने झुंजार खेळी केली. विराटने 49 बॉलमध्ये 77 धावा केल्या. यामध्ये त्याने 11 फोर अन् 2 सिक्स मारले. त्यामुळे त्याला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तेव्हा समालोचक हर्षा भोगले यांच्याशी बोलताना विराटने मनातील भावना व्यक्त केल्या. 'जेव्हा तुम्ही क्रिकेटविषयी बोलता तेव्हा तेव्हा लोक यश, आकडेवारी आणि आकड्यांबद्दल बोलतात. पण जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता, तेव्हा तुम्ही अनेक आठवणी तयार करत असता. आम्हाला ड्रेसिंग रुममध्ये राहुल भाई (द्रविड) याविषयीच सांगत असतात, जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा मनापासून खेळा कारण भविष्यात तुमची ही वेळ चुकणार आहे. मला मिळालेले प्रेम, कौतुक आणि पाठिंबा अप्रतिम आहे', असं विराट कोहली म्हणतो.
मला माहितीये की, जेव्हा टी-20 क्रिकेटचा विचार केला जातो तेव्हा माझं नाव आता जगाच्या विविध भागांमध्ये खेळाचा प्रचार करण्यासाठी वापरलं जातंय. पण, मला असं वाटतंय की माझ्यामध्ये अजूनही टी-ट्वेंटी क्रिकेट शिल्लक आहे, असं विराट कोहली म्हणाला आहे. त्यामुळे आता विराट कोहलीने बीसीसीआयला थेट संदेश दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता जूनमध्ये होणाऱ्या टी-ट्वेंटी वर्ल्डकपसाठी विराटच्या बाबतीत भारतीय निवड समिती कोणता निर्णय घेणार यावर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करताना विराट कोहलीचं नाव घेण्यात आलं होतं. त्यामुळे विराटने याची आठवण सिलेक्शन कमिटीला आणि बीसीसीआयला करून दिली आहे. अशातच आता विराटने सिलेक्शनचा चेंडू आगरकर आणि जय शहा यांच्या पारड्यात टाकल्याची चर्चा होताना दिसत आहे.