मॉस्को : डोपिंगच्या मुद्द्यावरून वारंवार निशाण्यावर असणाऱ्या रशियाला मोठा धक्का लागला आहे. उत्तेजक चाचणीच्या नियमांचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्यामुळे रशियावर ४ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. वर्ल्ड ऍन्टी डोपिंग एजन्सी (वाडा)ने रशियावर ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे रशियाला २०२० सालचं ऑलिम्पिक, फिफा वर्ल्ड कप २०२२ आणि वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सहभागी होता येणार नाही.
रशियाने डोपिंगच्या आकड्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर हेराफेरी केली. रणनिती करुन रशियाने फसवणूक केली आणि यासाठी नकली पुरावे देण्यात आले. डोपिंगला सिद्ध करणारे पुरावे आणि फाईलही नष्ट करण्यात आल्या, असं वाडाच्या चौकशीत समोर आलं आहे.
रशियाकडून डोपिंगच्या आकडेवारीमध्ये हेराफेरी केल्याचं प्रकरणं २०१४-१५ साली समोर आलं होतं. रशियाने तेव्हा सोच्चि विंटर ऑलिम्पिकचं आयोजन केलं होतं. या ऑलिम्पिकमध्ये रशियाने पदकं जिंकण्यासाठी खेळाडूंना जाणूनबुजून उत्तेजक द्रव्य दिली होती. ही उत्तेजक द्रव्य वाडाच्या प्रतिबंधित यादीमध्ये होती. यानंतर पुढच्या वर्षी २०१६ साली झालेल्या रियो ऑलिम्पिकमध्येही काही खेळाडूंना सहभागी होण्यापासून रोखण्यात आलं होतं.
डोपिंगच्या या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर वाडाच्या समितीने रशियावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. वाडाच्या या कारवाईवर रशिया पुढच्या २१ दिवसांमध्ये तक्रार करु शकतो. रशियाने तक्रार केली तर हे प्रकरण कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये जाऊ शकतं.