मुंबई : वेस्ट इंडिजचा सलामीवीर फलंदाज ख्रिस गेल याने रविवारी एक मोठी घोषणा केली. क्रिकेट विश्वातील एकदिवसीय सामम्यांतून काढता पाय घेत २०१९ च्या विश्वकप मालिकेनंतर तो संन्यास घेणार आहे. ११ सप्टेंबर १९९९ मध्ये त्याने टोरंटोच्या सीएससीसीमध्ये भारताविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यातून क्रिकेट विश्वात पदार्पण केलं होतं. गेल त्याच्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. विरोधी संघातील गोलंदाजांच्या नाकी नऊ आणणारा गेल हा जगभराती क्रीडारसिकांच्या विशेष आवडीचा. अफलातून खेळासोबतच मैदानातील त्याचा वावर हा पंचाचीही मनं जिंकून जातो.
३९ वर्षीय ख्रिस गेलने आतापर्यंतच्या एकदिवसीय कारकिर्दीत ९,७२७ इतक्या धावा केल्या आहेत. एकूण २८४ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ३६.९८ च्या सरासरीने ही धावसंख्या गाठली आहे. ख्रिसने त्याच्या कारकिर्दीत २३ शतकं आणि ४९ अर्धशतकं ठोकली आहेत. धावांचा हा डोंगर रचण्यासोबतच त्याने १६५ विकेट्सही घेतल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकणाऱ्या खेळाडूंमध्ये गेलच्याही नावाचा समावेश होतो. ज्यामध्ये गेलव्यतिरिक्त रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, मार्टिन गप्टिल या खेळाडूंचा समावेश आहे.
Windies Cricket: Batsman Chris Gayle has announced he will retire from One-day Internationals following the ICC Cricket World Cup 2019 England & Wales. (file pic) pic.twitter.com/ZfPoaHldWV
— ANI (@ANI) February 18, 2019
गेल्या बऱ्याच काळापासून गेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. गेल्या वर्षी गेल जुलै महिन्यात आपल्या देशासाठी खेळला होता. ज्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार कमीच दिसला. एकदिवसीय सामन्यात गेलच्या वादळी फलंदाजीची अनेकदा विशेष छाप पाहायला मिळाली आहे. त्याशिवाय कसोटी सामन्यामध्ये त्याने अनेकदा प्रभावी खेळीचं प्रदर्शन केलं आहे. आतापर्यंत १३० कसोटी सामन्यांमध्ये गेलने ४२.१८च्या सरासरीने ७,२१४ धावा केल्या आहेत. यामध्ये १५ शतकांचा समावेश आहे. कसोटी सामन्यांमध्ये ३३३ धावांची त्याची सर्वोत्तम खेळी क्रिकेट विश्वात अनेकांनाच भुवया उंचावणयास भाग पाडते.