भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट आल्यापासून, दौरा सुरू होण्यापूर्वीच तो रद्द होण्याची शंका व्यक्त करण्यात येतेय.

Updated: Nov 27, 2021, 09:55 AM IST
भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट आल्यापासून, दौरा सुरू होण्यापूर्वीच तो रद्द होण्याची शंका व्यक्त करण्यात येतेय.

जगभरातील सर्व देश दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासावर बंदी घालण्याचा विचार करत आहेत. भारत अ संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडियाला डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. दरम्यान, या दौऱ्याबाबत बीसीसीआयने अपडेट दिलं आहे.

InsideSportsच्या अहवालानुसार, देशात कोरोनाचे नवीन व्हेरिएंट आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने हाय अलर्ट लागू केला आहे. अशा परिस्थितीत बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी केली जात आहे. 

दरम्यान यामध्ये टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचं बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे. “आताच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. हा दौरा नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि CSAच्या संपर्कात आहोत. अशा कठीण काळात, आपण फक्त आशा करू शकतो की गोष्टी नियंत्रणात असतील."

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना 17 डिसेंबरपासून जोहान्सबर्गमध्ये खेळवला जाणार आहे. या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूच्या एक व्हेरिएंट दिसला आहे.

नवा व्हेरिएंट जास्त धोकादायक

नवीन 'B.1.1.529' व्हेरिएंट दक्षिण आफ्रिका आणि बोत्सवानामध्ये सापडला आहे. सतत म्यूटेशन होत असलेल्या या व्हेरिएंटमुळे WHO सोबतच शास्त्रज्ज्ञही धास्तावले आहेत. हा नवीन व्हेरिएंट डेल्टा पेक्षा जास्त धोकादायक आहे आणि त्यापेक्षा जास्त संसर्गजन्य आहे.

भारताचं दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक

  • 17 डिसेंबर पहिला कसोटी सामना -  जोहान्सबर्ग
  • 26 डिसेंबर दुसरा कसोटी सामना - सेंच्युरियन
  • 3 जानेवारी तिसरा कसोटी सामना - केप टाऊन
  • 11 जानेवारी पहिला एकदिवसीय सामना - पार्ल
  • 14 जानेवारी दुसरा एकदिवसीय सामना - केप टाऊन
  • 16 जानेवारी तिसरा एकदिवसीय सामना - केप टाऊन
  • 19 जानेवारी, 21 जानेवारी, 23 जानेवारी, 26 जानेवारी - टी 20 सामने