२६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या टेस्टला बॉक्सिंग डे टेस्ट का म्हणलं जातं?

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टेस्ट मॅचला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Updated: Dec 23, 2018, 08:47 PM IST
२६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या टेस्टला बॉक्सिंग डे टेस्ट का म्हणलं जातं? title=

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टेस्ट मॅचला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. २६ डिसेंबरला सुरु होणाऱ्या टेस्ट मॅचला बॉक्सिंग डे टेस्ट असं संबोधलं जातं. बॉक्सिंग डे टेस्ट हा शब्द ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या टेस्ट मॅचसाठी संबोधला जातो. पण अनेक जणांना याला बॉक्सिंग डे टेस्ट असं का म्हणतात हे माहिती नाही.

बॉक्सिंग डे म्हणजे ख्रिसमसच्या पुढचा दिवस. प्रत्येक वर्षी ऑस्ट्रेलिया २६ डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर एक टेस्ट मॅच खेळतं. बॉक्सिंग डे विषयी अनेक कहाण्या सांगितल्या जातात. रोमन कालखंड किंवा ईसाई कालखंडापासून बॉक्सिंग डेला सुरुवात झाल्याची अख्यायिका आहे. त्यावेळी धातूचे डब्बे चर्चच्या बाहेर ठेवले जायचे. सेंट स्टिफन्सची मेजवानी म्हणून भेटवस्तू म्हणून हे डबे गोळा केले जायचे.

१८७१ पासून संपूर्ण ब्रिटनमध्ये या दिवशी सुट्टी दिली जाते. ब्रिटन, कॅनडा, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या काही राज्यांमध्ये बॉक्सिंग डे शॉपिंगचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दुकानांमध्येही मोठा सेल लावण्यात येतो.

बॉक्सिंग डे आणि क्रिकेटचं नात

बॉक्सिंग डे आणि क्रिकेटच्या नात्याचीही एक कहाणी आहे. पहिले ऑस्ट्रेलियाची स्थानिक स्पर्धा असलेल्या शेफील्ड शिल्डमध्ये व्हिक्टोरिया आणि न्यू साऊथवेल्स यांच्यामध्ये बॉक्सिंग डेला मॅच व्हायची. ही मॅच ऑस्ट्रेलियामध्ये लोकप्रिय होती. कुटुंबासोबत ख्रिसमसचा आनंद घेता येत नसल्यामुळे खेळाडू मात्र नाराज व्हायचे.

ऑस्ट्रेलियाशिवाय दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्येही बॉक्सिंग डे टेस्टचं आयोजन करण्यात येतं. पहिल्यांदा बॉक्सिंग डे टेस्टची सुरुवात इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये १९१३ साली झाली. पण यानंतर पुढच्या बॉक्सिंग डे टेस्ट मॅचचं आयोजन करायला ४८ वर्ष लागली.

एक लाख प्रेक्षक बसू शकणाऱ्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर क्रिकेट रसिकांसाठी बॉक्सिंग डे टेस्ट ही मेजवानीच असते. या देशांमध्ये २५ तारखेपासून सुट्ट्यांना सुरुवात होते. २५ तारखेला ख्रिसमस साजरा केल्यानंतर २६ तारखेपासून ५ दिवस म्हणजेच ३० डिसेंबरपर्यंत टेस्ट मॅच खेळली जाते. यानंतर सहाव्या दिवशी ३१ डिसेंबरचा जल्लोष आणि सातव्या दिवशी नवीन वर्षाचं स्वागत, अशाप्रकारे ७ दिवसांची सुट्टी एन्जॉय केली जाते.