शेवटच्या क्षणी Rahul Dravid का झाला टीम इंडियाचा कोच?

भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविडचा बीसीसीआयने टीम इंडियाचा पुढील प्रशिक्षक म्हणून निर्णय घेतला आहे.

Updated: Oct 16, 2021, 02:40 PM IST
शेवटच्या क्षणी Rahul Dravid का झाला टीम इंडियाचा कोच? title=

मुंबई : भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविडचा बीसीसीआयने टीम इंडियाचा पुढील प्रशिक्षक म्हणून निर्णय घेतला आहे. बऱ्याच दिवसांपासून शास्त्रींनंतर भारताचा पुढील प्रशिक्षक कोण असेल यावर खूप चर्चा केल्या जात होत्या. पण यावर आता बीसीसीआयने स्पष्टीकरण दिलं आहे. टी 20 वर्ल्डकपनंतर द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक होईल. द्रविडची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यामागे अनेक कारणे आहेत.

तरूण खेळाडूंना मिळणार मदत

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी द्रविडसोबत बैठक घेतली. आणि द्रविडला टी -20 विश्वचषकानंतर भारतीय टीमचा प्रशिक्षक होण्यासाठी राजी केलंय. द्रविडला प्रशिक्षक बनवल्याने टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंना मदत होईल. सध्या अनेक युवा खेळाडूंनीही भारतीय संघात त्यांचं स्थान निर्माण करण्यास सुरुवात केलीये. हे सर्व खेळाडू 19 वर्षांखालील दिवसांमध्ये द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळले आहेत. 

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिेलेल्या माहितीनुसार, "जय आणि सौरव त्याच्याशी बोलले. द्रविडने नेहमीच भारतीय क्रिकेटची आवड अग्रस्थानी ठेवली आहे. त्यामुळे गोष्टी सोप्या झाल्या कारण संघासाठी त्याच्यासारखं कोणीतरी खेळाडूंना मार्गदर्शन करणं चांगलं होईल."

शांत स्वभावाचा द्रविड

राहुल द्रविड अतिशय शांत खेळाडू आहे. द्रविडच्या चेहऱ्यावर दडपण असताना देखील कधीही तणाव दिसून येत नाही. यामुळे खेळाडूंना दबाव हाताळताना बरंच काही शिकण्यास मदत होईल. याशिवाय, 19 वर्षांखालील प्रशिक्षक असतानाही द्रविडचा विक्रम उत्कृष्ट आहे. त्याने ऋषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि इशान किशन सारखे खेळाडू देशाला दिले आहेत.

रवी शास्त्री यांचं शेवटचं टूर्नामेंट

रवी शास्त्री यंदाच्या टी -20 वर्ल्डकप नंतर टीम इंडियाच्या कोचपदावरून पायउतार होतील. 2017 मध्ये शास्त्री प्रथमच टीम इंडियाचे कोच बनले. त्यानंतर टीमने ऑस्ट्रेलिया आणि जगातील अनेक मोठ्या देशांमध्ये चांगला खेळ करून दाखवला. पण शास्त्रींच्या कार्यकाळातही भारत आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकलेली नाही.