ICC Rules Changes: मॅक्सवेलच्या खेळीमुळे तरी ICC चे डोळे उघडणार? वर्ल्डकपनंतर 'हे' 2 नियम बदलणार?

ICC Runner and Time Out Rules Changes: आता 2023 चा वर्ल्डकप सुरु असून यामध्ये भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या तीन टीमने आपली जागा निश्चित केलीये. मात्र आतापर्यंत झालेल्या 40 सामन्यांमध्ये असे वाद झाले आहेत, ज्यामुळे आयसीसीला पुन्हा एकदा दोन प्रमुख नियमांवर विचार करावा लागणार आहे.

सुरभि जगदीश | Updated: Nov 9, 2023, 09:13 AM IST
ICC Rules Changes: मॅक्सवेलच्या खेळीमुळे तरी ICC चे डोळे उघडणार? वर्ल्डकपनंतर 'हे' 2 नियम बदलणार? title=

ICC Runner and Time Out Rules Changes: सध्या वर्ल्डकप सुरु असून सामन्यांमध्ये अनेक रोमांचक गोष्टी घडताना दिसतायत. मुळात क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये रोज नवीन थरार पाहायला मिळतो. शेवटचा वनडे वर्ल्डकप हा 2019 साली इंग्लंडमध्ये खेळला गेला. याची फायनल प्रत्येक व्यक्तीच्या लक्षात आहे. बाऊंड्री काऊंटच्या नियमांनुसार, इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आलं होतं. 

दरम्यान हा आयसीसीचा निर्णय आणि नियम काहीसा वादग्रस्त ठरलेला दिसला. या नियमावर बरीच टीका झाली होती. त्यामुळे परिणामी त्याच वर्षी आयसीसीने हा नियम काढून टाकला. याशिवाय आयपीएलमध्ये गोलंदाज रविचंद्रन अश्विनने मंकडिंगद्वारे जॉस बटलरला बाद केलेलं. यानंतर पुन्हा वाद सुरू झाला, त्यानंतर आयसीसीने हा शब्द काढून हा नियम बदलला आणि त्याला रनआउट म्हटलं. यासह, नो बॉल आणि सॉफ्ट सिग्नल यांच्या नियमांमध्येही या वर्ल्डकपमध्ये बदल झाले.

ICC ला पुन्हा 'या' नियमांचा विचार करावा लागणार

आता 2023 चा वर्ल्डकप सुरु असून यामध्ये भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या तीन टीमने आपली जागा निश्चित केलीये. मात्र आतापर्यंत झालेल्या 40 सामन्यांमध्ये असे वाद झाले आहेत, ज्यामुळे आयसीसीला पुन्हा एकदा दोन प्रमुख नियमांवर विचार करावा लागणार आहे.

टाईम आऊट आणि रनरच्या नियमांमुळे नवा वाद

यामधील पहिला नियम हा टाइम आऊटचा नियम आहे. बांगलादेशी कर्णधार शाकीब अल हसनने श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊटद्वारे बाद केलं. यानंतर या विकेटचं रूपांतर वादामध्ये धालं. वर्ल्डकपच्या नियमांनुसार, कोणत्याही फलंदाजाची विकेट पडल्यानंतर नवीन फलंदाजाला 2 मिनिटांत पुढचा बॉल खेळण्यासाठी तयार राहावं लागतं.

बांगलादेश विरूद्ध श्रीलंकेच्या सामन्यामध्ये मॅथ्यूज 2 मिनिटांतच खेळपट्टीवर आला होता, मात्र त्याच्या हेल्मेटचा स्ट्रॅप तुटल्याने तो निर्धारित वेळेत पुढचा बॉल खेळण्यास येऊ शकला नाही. यानंतर शाकिबच्या आवाहनानंतर मैदानी अंपायरनेनी मॅथ्यूजला टाईम आऊट करार दिला. या प्रकरणानंतर काही लोकांनी शाकिबच्या खेळ भावनेवर प्रश्न उपस्थित केला. याशिवाय आयीसीसीवर काहींनी प्रश्न देखील उपस्थित केले. त्यामुळे या नियमामध्ये बदल केला जाण्याची मागणी करण्यात येतेय.

रनरच्या नियमावरून चाहत्यांनी आयसीसीला धरलं धारेवर

मंगळवारी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान रनरच्या नियमाचा वाद समोर आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा ३ विकेट्स राखून पराभव केला. 292 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारू टीमने 91 धावांत 7 विकेट गमावल्या. मात्र यावेळी ग्लेन मॅक्सवेलने नाबाद द्विशतक झळकावून टीमला विजय मिळवून दिला. पण मॅक्सवेलची ही खेळी सोपी नव्हती. या खेळीदरम्यान मॅक्सवेलला पाठदुखीची तक्रार तसंच हॅमस्ट्रिंगचीही गंभीर दुखापत झाली होती.

या सामन्यादरम्यान मॅक्सवेल लंगडत खेळताना दिसला. एक वेळ अशी आली जेव्हा मॅक्सवेलला उभे राहताही येत नव्हते. या सामन्यात फिजिओने मैदानात येऊन मॅक्सवेलवर उपचार केले. मॅक्सवेलला दुखापतग्रस्त रिटायर होण्यासही सांगितलं होतं, मात्र सामना जिंकणं खूप महत्त्वाचं होतं. अशा परिस्थितीत तो मैदानाबाहेर गेला नाही. 

या वेळी चाहत्यांनी मॅक्सवेलला 'रनर'ची सुविधा का दिली नाही, असा प्रश्न उपस्थित केला. या सामन्यादरम्यान कॉमेंट्रीटरच्या म्हणण्यानुसार, आयसीसीने रनर नियम आधीच काढून टाकला आहे. त्यामुळे मॅक्सवेलला रनर घेता आला नाही. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा आयसीसी आणि त्याचे नियम चाहत्यांच्या रडारवर आले आहेत. त्यामुळे रनरच्या नियमावरही आयसीसीला पुन्हा एखदा विचार करावा लागणार आहे. 

का हटवला रनरचा नियम?

1744 मध्ये जेव्हा क्रिकेटचे नियम बनवले गेले तेव्हा रनरसाठी कोणतीही तरतूद नव्हती. मात्र नंतर हा नियम लागू करण्यात आला. मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) च्या नियम क्रमांक 25 मध्ये याचा तपशीलवार उल्लेख करण्यात आलाय. जेव्हा एखादा फलंदाज जखमी होतो आणि धावा काढू शकत नाही, तेव्हा त्याच्या टीमतील प्लेइंग-11 मधील कोणताही खेळाडू रनर म्हणून येऊ शकतो.

या नियमानुसार, रनरलाही फलंदाजाप्रमाणे संपूर्ण किट घालावं लागतं आणि बॅटही हातात घ्यावी लागते. रनरच्या उपस्थितीत फलंदाजी करणाऱ्या खेळाडूच्या जागी रनरला रन घ्यावा लागतो. मात्र, क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडूंनी या नियमाचा गैरवापर करण्यास सुरुवात केल्याच्या अनेक गोष्टी घडल्या. यामध्ये पाकिस्तानचा सईद अन्वर आणि भारताचा नवज्योत सिद्धू यांचा समावेश आहे. 
या सर्व घटना वादानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) दीर्घ विचारविनिमयानंतर 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 'रनरचा नियम' रद्द केला. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणताही फलंदाजाला दुखापत झाली तर त्याला रिटायर हर्ट व्हावं लागतं. यामुळेच मॅक्सवेलला रनर देण्यात आला नाही.