World Cup 2019 : INDvBAN सामन्यात भारतीय संघाच्या वयोवृद्ध 'जबरा फॅन'चीच चर्चा

आजीबाईंचा उत्साह क्रीडारसिकांनाही लाजवणारा 

Updated: Jul 3, 2019, 06:17 PM IST
World Cup 2019 : INDvBAN सामन्यात भारतीय संघाच्या वयोवृद्ध 'जबरा फॅन'चीच चर्चा

मुंबई : भारत विरुद्ध बांगलादेश या संघांमध्ये यंदाच्या विश्वचषकादरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा २८ धावांनी पराभव केला. या विजयासह विराटसेनेने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीमध्ये धडक मारली. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा, खेळाडूंचा हरवलेला सूर या सामन्यात गवसल्याचं पाहायला मिळालं. परिणामी सामन्यादरम्यान अनेक लक्षवेधी प्रसंग पाहण्याची संधी क्रीडारसिकांना मिळाली. त्यातीलच एक प्रसंग म्हणजे मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला पाठिंबा देणाऱ्या अफलातून आणि प्रचंड उत्साही अशा ‘जबरा फॅन’विषयीचा. 

‘जबरा फॅन’ म्हटलं की त्यात सारंकाही आलं. हा शब्द ८७ वर्षीय आजीबाईंसाठी पूर्णपणे लागू आहे. बांगलादेशविरोधात भारताच्या खेळाडूंची कामगिरी पाहतानाच मैदानात, टेलिव्हिजनवर सामना पाहणारे रसिक आणि सोशल मीडियावरचे नेटकरी यांच्यात चर्चा रंगली ती म्हणजे चारुलता पटेल या आजीबाईंची. 

क्रिकेटचं प्रचंड वेड असणाऱ्या या आजी तरुणांनाही लाजवेल इतक्या उत्साहात भारताच्या खेळाडूंचं समर्थन करत होत्या. यावेळी त्यांच्या उत्साहाला खरंच कशाची तोड नाही, अशीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली. सामन्याच्या नंतर विराट कोहली, आणि रोहित शर्मानेही या आजींची भेट घेतली. यावेळी त्यांनी हात उंचावत खेळाडूंना आशीर्वाद दिला. यावेळी विराट आणि रोहितच्या चेहऱ्यावरील भावनाही पाहण्याजोग्या होत्या. जेव्हा खेळाडू या आजींची भेट घेण्यासाठी आल्या, तेव्हा मैदानात उपस्थित प्रेक्षकांनी एकच कल्ला करण्यास सुरुवात केली. विराटनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन  आजींसोबतच्या भेटीचे काही फोटो पोस्ट केले. 

'मी सर्वच चाहत्यांचे आभार मानतो. विशेषत: चारुलता पटेल यांचे आभार. ८७ वर्षांच्या वयातही मी आतापर्यंत पाहिलेल्या चाहत्यांपैकी त्या सर्वात उत्साही आणि समर्पित चाहत्यांपैकी एक. वाढतं वय हा फक्त एक आकडा आहे. कोणत्याही गोष्टीप्रती असणाऱी आत्मियता आणि समर्पकता सर्व सीमा ओलांडण्यास मदत करतात. त्यांच्या डोळ्यांत संपूर्ण भारतीय संघासाठी अपार प्रेम आणि खुप साऱ्या आशीर्वादाच्याच भावना मी पाहिल्या', असं कॅप्शन लिहित या आजी म्हणजे अनेकांसाठीच प्रेरणा असल्याचं म्हणत पुढील, सामन्यासाठी त्यांच्या आशीर्वादासह वाटचाल करत असल्याचं स्पष्ट केलं.