लंडन : ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी इंग्लंडच्या टीमने फक्त ३ वनडे आणि १ टी-२० मॅच खेळलेल्या जोफ्रा आर्चरला संधी दिली आहे. काही दिवसांपूर्वी भारतात झालेल्या आयपीएलमध्ये जोफ्रा आर्चरने चांगली कामगिरी केली होती. इंग्लंडच्या टीममध्ये निवड झालेला जोफ्रा आर्चर आनंदी असला, तरी त्याच्या अपेक्षा मोठ्या आहेत. वर्ल्ड कपमध्ये आर्चरला सगळ्यात मोठी विकेट घ्यायची आहे.
क्रिकेटच्या सगळ्यात मोठ्या स्पर्धेमध्ये मला भारताचा कर्णधार विराट कोहलीची विकेट घ्यायची आहे, असं वक्तव्य आर्चरने केलं. स्काय स्पोर्ट्सशी बोलताना आर्चर म्हणाला, 'मला विराटची विकेट घ्यायची आहे, कारण आयपीएलमध्ये मला त्याची विकेट घेण्याची संधी मिळाली नाही. बहुतेक मॅचमध्ये लेग स्पिनरनी विराटची विकेट घेतली. मला एबी डिव्हिलियर्सविरुद्धही बॉलिंग करायची होती, पण त्याने निवृत्ती घेतली आहे. क्रिस गेलची विकेट घेण्याचीही माझी इच्छा आहे.'
जोफ्रा आर्चरचा जन्म वेस्ट इंडिजच्या बारबाडोसमध्ये झाला आहे. २४ वर्षांच्या आर्चरची वर्ल्ड कपच्या इंग्लंड टीममध्ये निवड डेव्हिड विलीऐवजी झाली. काही आठवड्यांआधीच आर्चरने इंग्लंडकडून पदार्पण केलं. आर्चरने आत्तापर्यंत फक्त ३ वनडे आणि १ टी-२० आंतरराष्ट्रीय मॅच खेळली आहे. आर्चरने राजस्थानकडून आयपीएलच्या या मोसमात ११ मॅचमध्ये ११ विकेट घेतल्या होत्या.
आयपीएलमधला अनुभव माझ्या कामाला येईल, असा विश्वास आर्चरने व्यक्त केला. आयपीएलमध्ये मी जगातल्या सर्वोत्तम बॅट्समनचा सामना केला. आयपीएलमुळे वर्ल्ड कपची तयारी करण्याची संधी मिळाली, अशी प्रतिक्रिया आर्चरने दिली.
इयोन मॉर्गन (कर्णधार), जॉस बटलर, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, टॉम कुरन, मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, लियाम डॉसन, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जेम्स विन्स, क्रिस वोक्स, मार्क वूड