मुंबई : क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होईल. २०१५ सालचा वर्ल्ड कप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियापुढे हा वर्ल्ड कप स्वत: कडेच ठेवण्याचं आव्हान असेल. तर भारत आणि इंग्लंड या टीमही वर्ल्ड कप जिंकण्याच्या प्रबळ दावेदार आहेत. आत्तापर्यंत सर्वाधिक ५ वर्ल्ड कप हे ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत.
मागच्या काही वर्ल्ड कपपेक्षा ही यावेळी जास्त स्पर्धा असेल, कारण यावेळी वर्ल्ड कप वेगळ्या फॉरमॅट खेळवण्यात येणार आहे. १९९२ सालच्या वर्ल्ड कपप्रमाणे यावेळी प्रत्येक टीम ग्रुप स्टेजमध्ये एकमेकांविरुद्ध एक सामना खेळतील. ग्रुप स्टेजमधल्या टॉप-४ टीम या सेमीफायनलमध्ये जातील. सेमी फायनल जिंकणाऱ्या दोन टीममध्ये फायनल रंगेल.
वर्ल्ड कपची तारीख जवळ आल्यामुळे प्रत्येक क्रिकेट बोर्डाने १५ सदस्यीय टीमची घोषणा केली आहे. या टीममध्ये अनेक प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळाली नाही. आयसीसीनेही अशाच ११ खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये ऋषभ पंत आणि अंबाती रायुडू या दोन खेळाडूंचा समावेश आहे.
आयसीसीच्या या यादीमध्ये वेस्ट इंडिजचा कायरन पोलार्ड, ऑस्ट्रेलियाचा पीटर हॅण्ड्सकॉम्ब आणि श्रीलंकेच्या निरोशन डिकवेला यांचा समावेश आहे. मुळचा वेस्ट इंडिजचा असलेला आणि नुकतचं इंग्लंडचं नागरिकत्व मिळालेल्या जोफ्रा आर्चरचाही या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. जोफ्रा आर्चरची वर्ल्ड कपसाठीच्या इंग्लंडच्या प्राथमिक टीममध्ये निवड झालेली नाही, पण आयर्लंड आणि पाकिस्तानविरुद्धच्या सीरिजमध्ये त्याला संधी देण्यात आली आहे. या दोन सीरिजमध्ये आर्चरने स्वत:ला सिद्ध केलं, तर त्याची वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये निवड होईल, असं इंग्लड क्रिकेट बोर्डाने सांगितलं आहे.
पाकिस्तानच्या टीमने त्यांचा कर्णधार आणि विकेट कीपर सरफराज अहमद याला पर्याय म्हणून दुसरा विकेट कीपर टीममध्ये घेतला नाही. यामुळे मोहम्मद रिझवानला संधी मिळाली नाही. नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सीरिजमध्ये रिझवानने दोन शतकं केली होती.
निरोशन डिकवेला, अंबाती रायुडू, ऋषभ पंत, पीटर हॅण्ड्सकॉम्ब, दिनेश चंडीमल, कायरन पोलार्ड, मोहम्मद रिझवान, असीफ अली, जोफ्रा आर्चर, अकिला धनंजया, मोहम्मद आमीर