World Cup 2019: 'सचिनपेक्षा जास्त सरासरी असणारा रायुडू टीममध्ये हवा होता का?'

वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीमची सोमवारी घोषणा करण्यात आली.

Updated: Apr 16, 2019, 10:28 PM IST
World Cup 2019: 'सचिनपेक्षा जास्त सरासरी असणारा रायुडू टीममध्ये हवा होता का?' title=

मुंबई : वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीमची सोमवारी घोषणा करण्यात आली. या टीममधून अंबाती रायुडू आणि ऋषभ पंत यांना डच्चू देण्यात आला. या दोघांच्याऐवजी विजय शंकर आणि दिनेश कार्तिक यांना संधी देण्यात आली आहे. पण अंबाती रायुडूला डावलल्यानंतर आता खुद्द आयसीसीने याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

'अंबाती रायुडू हा सर्वाधिक सरासरी (कमीतकमी २० इनिंग) असणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. सचिनपेक्षाही अंबाती रायुडूची सरासरी चांगली आहे. रायुडूची भारताच्या वर्ल्ड कप टीममध्ये निवड झाली नाही. रायुडू भारतीय टीममध्ये हवा होता का?' असा सवाल आयसीसीने ट्विटरवर विचारला आहे.

सर्वाधिक सरासरी असणारे भारतीय खेळाडू (कमीतकमी २० इनिंग)

विराट कोहली- ५९.५७

एमएस धोनी- ५०.३७

रोहित शर्मा- ४७.४९

अंबाती रायुडू- ४७.०५

सचिन तेंडुलकर- ४४.८३

खरं तर वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममध्ये दोन जागांसाठी चार खेळाडूंमध्ये स्पर्धा होती. अंबाती रायुडू किंवा विजय शंकर आणि दिनेश कार्तिक किंवा ऋषभ पंत यांनाच भारतीय टीममध्ये संधी मिळणार होती.

मागच्या वर्षभरामध्ये अंबाती रायुडूला चौथ्या क्रमांकावर खेळवण्यात आलं, पण मागच्या ४ महिन्यांमध्ये रायुडूचा फॉर्म अचानक ढासळला. नोव्हेंबर २०१८ नंतरच्या १० वनडेमध्ये रायुडूला फक्त एक अर्धशतक करता आलं. या १० इनिंगपैकी ५ इनिंगमध्ये रायुडू २० पेक्षा कमी रन करून आऊट झाला. कामगिरीमधल्या या अनिश्चिततेमुळे रायुडूला संधी मिळाली नाही. वनडे क्रिकेटमध्ये रायुडूने ५५ मॅचमधल्या ५० इनिंगमध्ये ४७.०५ च्या सरासरीने १,६९४ रन केले आहेत.

अशी असणार भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, केएल राहुल, विजय शंकर