लंडन : क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताकडून पराभूत झाल्यानंतर आपल्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आला होता, अशी धक्कादायक कबुली पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी दिली आहे. गेल्या १६ जून रोजी मँचेस्टरला झालेल्या सामनात भारतानं पाकिस्तानचा ८९ धावांनी दणदणीत पराभव केला. या पराभवाचं शल्य मिकी आर्थर यांना एवढं बोचत होतं की, त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार आला.
भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान सेमी फायनल गाठू शकणार नाही, अशी शंका त्यांना आली. त्यामुळं आत्महत्येचे विचार डोक्यात घोळू लागल्याचं आर्थर यांनीच स्पष्ट केलं आहे.
Mickey Arthur "last Sunday I wanted to commit suicide" #CWC19 pic.twitter.com/Xkb3IgD0QS
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) June 24, 2019
भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबावर टीका केली होती. यानंतर सरफराज, शोएब मलिक आणि मोहम्मद आमिर यांनीही कुटुंबांवर टीका करु नका, आमच्या खेळावर टीका करा, असं आवाहन केलं होतं.
यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही पाकिस्तानला भारताकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर पाकिस्तानच्या टीमवर त्यांच्या चाहत्यांनी जोरदार टीका केली. या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक झाली आहे. भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानने जोरदार पुनरागमन केलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तानचा ४९ रननी विजय झाला.
या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचे ६ मॅचमध्ये ५ पॉईंट्स आहेत. आता पाकिस्तानच्या मॅच न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध आहेत. या तिन्ही मॅच जिंकल्यास पाकिस्तानच्या खात्यात ११ पॉईंट्स होतील. तरी पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दुसऱ्या टीमच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागू शकतं.