लंडन : यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेला ३० मेपासून सुरुवात झाली. क्रिकेट वर्ल्ड कपचे हे १२वे पर्व आहे. वर्ल्ड कपमध्ये आपल्या देशाकडून खेळायची संधी मिळावी, असे स्वप्न प्रत्येक खेळाडूचे असते. काही खेळाडूंना ही संधी मिळते तर काही खेळाडूंना पुढील ४ वर्षांपर्यंत वाट पाहावी लागते. परंतु काही खेळाडू इतके नशिबवान आहेत, की त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर २ वेगळ्या देशांकडून वेगवेगळ्या वर्ल्ड कप स्पर्धेत प्रतिनिधित्व केले आहे.
अँडरसन कॅमीन्स, केपलर वेसल्स, इयन मॉर्गन आणि एड जोयस या चार खेळाडूंनी दोन वेगवेगळ्या टीमकडून वर्ल्ड कप स्पर्धेत खेळले आहेत.
सध्या इंग्लंडच्या टीमचा कर्णधार असलेला इयन मॉर्गन दोन देशांकडून वर्ल्ड कप खेळला. २००७ वर्ल्ड कपमध्ये मॉर्गन आयर्लंडच्या टीममध्ये होता, यानंतर २०११, २०१५ आणि २०१९ सालचा वर्ल्ड कप मॉर्गन इंग्लंडकडून खेळतोय.
एड जॉयसने वनडे क्रिकेटमध्ये आयर्लंड विरुद्ध पदार्पण केले. यानंतर काही वर्षांनी तो आयर्लंड टीममध्ये सामील झाला. एड जॉयसने आपल्या कारकिर्दीतील पहिला वर्ल्ड कप २००७ साली इंग्लंडकडून खेळला होता. यानंतरचे म्हणजेच २०११ आणि २०१५ च्या वर्ल्ड कपमध्ये त्याने इंग्लंडकडून प्रतिनिधित्व केले होते.
केप्लर वेसल्स यांनी ऑस्ट्रेलियाकडून न्यूझीलंडविरुद्ध ९ जानेवारी १९८३ साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. केप्लर वेसल्स यांनी आपल्या वनडे कारकिर्दीत एकूण २ वर्ल्ड कप स्पर्धा खेळले. यातील १९८३ च्या वर्ल्ड कपमध्ये ते ऑस्ट्रेलियाकडून खेळले होते. या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून ३ मॅच खेळल्या.
दक्षिण आफ्रिकेवर घातलेली बंदी उठल्यानंतर टीमचं १९९२ वर्ल्ड कपमध्ये आगमन झालं. यावेळी केपलर वेसल्स यांनी दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं.
अंडरसन कमीन्सने २० नोव्हेंबर १९९१ ला पाकिस्तानविरुद्ध वनडेमध्ये पदार्पण केले होते. अंडरसनने १९९२ सालचा वर्ल्ड कप वेस्ट इंडिजकडून खेळला होता. आपल्या पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये अंडरसनने १२ विकेट घेतल्या होत्या. यानंतर १५ वर्षांनी वयाच्या ४०व्या वर्षी अंडरसन कमीन्सनी पुनरागमन केलं. २००७ वर्ल्ड कपमध्ये अंडरसन कमीन्स कॅनडाकडून खेळला. कॅनडाकडून खेळताना ३ मॅचमध्ये कमिन्सने २ विकेट घेतल्या.