लीड्स : टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रनचा विक्रम बनवण्याच्या जवळ पोहोचला आहे. रोहित शर्माचे या वर्ल्ड कपमध्ये ६४७ रन झाले आहेत. एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने २००३ वर्ल्ड कपमध्ये ६७३ रन केले होते. रोहित शर्माला हा विक्रम मोडण्यासाठी आणखी २७ रनची गरज आहे.
एका वर्ल्ड कपमध्ये ६०० पेक्षा जास्त रन करण्याचं रेकॉर्ड आत्तापर्यंत ४ वेळाच झालं आहे. २००३ साली सचिन तेंडुलकरने, २००७ सालच्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने ६५९ रन केले होते. तर २०१९च्या या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशच्या शाकीब अल हसनने ६०६ रन केले. बांगलादेशची टीम सेमी फायनलला न पोहोचल्यामुळे आता शाकीब पुढे जाऊ शकणार नाही.
टीम इंडियाने याआधीच सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे रोहित शर्माला हा विक्रम करण्यासाठी कमीत कमी आणखी एक संधी मिळणार आहे. जर टीम इंडिया वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली तर रोहितला हा विक्रम करण्याच्या दोन संधी असतील.
श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये शतक झळकावून रोहित शर्माने विक्रमाला गवसणी घातली आहे. एकाच वर्ल्ड कपमध्ये ५ शतकं करणारा रोहित शर्मा हा पहिला खेळाडू बनला आहे. याआधी हा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर होता. संगकाराने २०१५ वर्ल्ड कपमध्ये ४ शतकं केली होती.
या शतकासोबतच रोहितने वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकं करण्याच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे. सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांच्या नावावर वर्ल्ड कपमध्ये एकूण ६ शतकं आहेत. सचिनने ६ वर्ल्ड कपच्या ४४ इनिंगमध्ये ६ शतकं केली, तर रोहितने फक्त १६ इनिंगमध्येच ६ शतक पूर्ण केली आहेत. या यादीमध्ये रिकी पाँटिंगने ४२ इनिंगमध्ये, कुमार संगकाराने ३५ इनिंगमध्ये ५ शतकं केली होती.
२०१९ वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने ५ शतकं तर २०१५ वर्ल्ड कपमध्ये १ शतक केलं होतं. २०१५ वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये रोहितने बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी केली होती. या वर्ल्ड कपमध्ये रोहितने दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध शतक केलं आहे.